झाकीर हुसैन यांच्या मृत्यूनंतर राज ठाकरे भावूक! म्हणाले, 'असं म्हणतात झाकीर हुसैन यांचे...'

Raj Thackeray Tribute To Zakir Hussain: मागील काही काळापासून गंभीर आजाराने ग्रासलेल्या झाकीर हुसैन यांच्या अमेरिकेमध्ये उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. राज ठाकरेंनी भावूक शब्दांमध्ये या महान तबलावादकाला श्रद्धांजली अर्पण केली आहे. नेमकं काय म्हणाले आहेत राज ठाकरे ते पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 16, 2024, 11:37 AM IST
झाकीर हुसैन यांच्या मृत्यूनंतर राज ठाकरे भावूक! म्हणाले, 'असं म्हणतात झाकीर हुसैन यांचे...' title=
राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

Raj Thackeray Tribute To Zakir Hussain: जगप्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार उस्ताद झाकीर हुसैन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. भारतीय वेळेनुसार रविवारी (15 डिसेंबर रोजी) रात्रीच ही बातमी समोर आल्यानंतर सोमवारी कुटुंबाने या वृत्ताला दुजोरा दिला. झाकीर हुसैन यांनी वयाच्या 73 वर्षी त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी भावूक शब्दांमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

...असं मला नेहमी वाटत राहिलं

राज ठाकरेंनी झाकीर हुसैन यांचा एका फोटो आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत पोस्टमधून भावना व्यक्त केल्या आहेत. "जगप्रसिद्द तबला वादक, पद्मविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांचं दुःखद निधन झालं. निसर्गातील प्रत्येक गोष्ट एका लयीत सुरु असते, मग तो श्वास असू दे की वाहणारा वारा असू दे की फुलणारी फुलं असू देत, या प्रत्येकातील लय अगदी मोजक्या लोकांना जाणवते, अनुभवता येते, आणि अशी माणसं अतिशय लयबद्ध असतात, तालबद्ध असतात, आणि ती त्यांच्या क्षेत्रातील योगी पुरुष ठरतात. उस्ताद झाकीर हुसैन हे तबल्यातील 'तालयोगी' होते असं मला नेहमी वाटत राहिलं," असं राज ठाकरेंनी झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं आहे.

...तरी ते पेलवावं झाकीरजींनीच

पुढे बोलताना राज ठाकरेंनी, "असं म्हणतात झाकीर हुसैन यांचे वडील अल्लाह रखा खान साहेबांनी, जाकीरजींच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या कानात हळूच तबल्याचे बोल सांगितले. असलं जबरदस्त बाळकडू किती जणांच्या वाट्याला येतं मला माहित नाही, आणि जरी आलं तरी ते पेलवावं झाकीरजींनीच," अशा शब्दांमध्ये बाप-लेकाच्या कौशल्याचं कौतुक केलं आहे. 

वयाच्या 12 व्या वर्षापासूनच ते...

"वयाच्या 12 व्या वर्षापासूनच ते वडिलांच्या सोबत मैफिलीत साथीला बसू लागले. तो काळ असा होता की पंडित रविशंकर यांच्यामुळे भारतीय वाद्यसंगीताबद्दल जागतिक पातळीवर प्रचंड आकर्षण निर्माण झालं होतं आणि जगभरातील नामांकित वादक, भारतीय वाद्यसंगीताच्यासोबत विविध प्रयोग करायला उत्सुक होतं. एका अर्थाने भारतीय संगीत जागतिकरणाच्या युगात शिरत होतं, अशावेळेला झाकीर हुसैन यांनी, 'शक्ती' बँडची स्थापना केली, आणि भारतीय संगीताची शक्ती जगाला अधिकच जाणवू लागली," असा उल्लेख राज ठाकरेंनी केला आहे. 

प्रत्येक वाद्य त्या वादकाला काहीतरी...

"प्रत्येक वाद्य त्या वादकाला काहीतरी सांगत असतं, आणि ते ऐकू येणं आणि त्याला वादकाने प्रतिसाद देणं ही क्रिया निरंतर सुरु असते. अशी निरंतर पण खूप खोल प्रक्रिया उस्तादजी आणि तबल्यात जवळपास 73 वर्ष सुरु होती. जी आज थांबली. उस्तादजी जरी अनंतात विलीन झाले तरी त्यांच्या तबल्यावरचा ताल अनंत काळापर्यंत ऐकू येईल," असं राज यांनी पोस्टच्या शेवटची म्हटलं आहे. " 

"उस्ताद झाकीर हुसैन यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली," असं म्हणत राज यांनी पोस्टचा शेवट केला आहे.