मुंबई : 'आज के शिवाजी' या पुस्तकातं छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केली आहे. हा वाद सध्या वाढला असून सर्वच स्तरावरून यावर प्रतिक्रिया येत आहेत. भाजप पक्षाने आपली यावर ठाम भूमिका मांडावी अशी मागणी होत असताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिप्रश्न विचारला आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा म्हटलेलं कसं चालतं ? असा प्रश्न विचारला असून 'आज के शिवाजी' या पुस्तकावरुन पक्षाची भूमिका मांडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना मुनगंटीवार म्हणाले की,'जोपर्यंत ब्रम्हांड आहे तोपर्यंत शिवरायांची तुलना होऊ शकत नाही.' पण यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वापरली जाणारी उपमा 'जाणता राजा' ही शरद पवारांसाठी सर्रास वापरली जाते. तसेच इंदिरा गांधींना 'इंदिरा इज इंडिया' असं म्हटलं जातं. ते तुम्हाला मान्य आहे, याची आठवण मुनगंटीवारांनी करून दिली आहे. (भूमिका स्पष्ट करा, चिडचीड करुन फायदा नाही, राऊतांचा टोला)
'या देशात शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येणं शक्यच नाही हे खरं आहे. जोपर्यंत ब्रम्हांड आहे तोपर्यंत कोणीही त्यांच्या तुलना करु शकत नाही. नरेंद्र मोदीदेखील करु शकत नाहीत,' असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. “पण मोदी देशाला ज्याप्रमाणे विकासाच्या मार्गावर नेत आहेत, देशाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत, अनेक जटील प्रश्न सोडवले त्यामुळेच त्यांच्याबद्दल घाणेरडं राजकारण केलं जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
विरोधकांकडून राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अत्यंत नीच दर्जाचं राजकारण केलं जात आहे. इंदिरा गांधींनी जेव्हा बांग्लादेशविरोधी युद्ध जिंकलं तेव्हा त्यांची तुलना दुर्गादेवीसोबत करण्यात आली होती. 'इंदिरा गांधी दुर्गादेवीचा अवतार,' असल्याचं म्हटलं होतं. पण एखाद्या व्यक्तीचा गौरव करताना असं वक्तव्य अनेकदा केलं जातं, असं ते यावेळी म्हणाले.