मुंबई दक्षिण लोकसभा निकाल 2024: अरविंद सावंतांची हॅटट्रिक, दक्षिण मुंबई मतदारसंघात ठाकरेंचा शिलेदार विजयी

मुंबई दक्षिण लोकसभा निकाल 2024: अखेर शिवसेना ठाकरे गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अरविंद सावंत यांनी हॅटट्रिक मिळवली आहे.

Updated: Jun 4, 2024, 04:24 PM IST
मुंबई दक्षिण लोकसभा निकाल 2024: अरविंद सावंतांची हॅटट्रिक, दक्षिण मुंबई मतदारसंघात ठाकरेंचा शिलेदार विजयी title=

Mumbai South Lok Sabha Election Result 2024 News in Marathi: लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील सर्वाधिक महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणून दक्षिण मुंबई मतदारसंघाला ओळखले जाते. या मतदारसंघात दोन कडवट शिवसैनिकांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. अखेर या मतदारसंघातून सलग दोन वेळा खासदार झालेले अरविंद सावंत विजयी झाले आहेत. अरविंद सावंत यांनी विजयाची हॅटट्रिक केली. 

दक्षिण मुंबई मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटातून अरविंद सावंत निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार यामिनी जाधव या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अरविंद सावंत यांना 3 लाख 9 हजार 428 मते मिळाली आहेत. तर यामिनी जाधव यांना 2 लाख 68 हजार 762 मते मिळाली आहेत. यामिनी जाधव यांचा 40 हजार मतांनी पराभव झाला आहे. 

अरविंद सावंत यांनी विजयी झाल्यानंतर मतदारांचे आभार मानले आहेत. ”ज्या विश्वासाने उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली. त्यासाठी त्यांचे मी आभार मानतो. मी एकही पैसा न वाटता मला मतदान करणाऱ्या मतदारांचा मी कायम कृतज्ञ राहीन. मोदींचा चेहरा घेऊन जिंकत आलो असा आमच्यावर कायम आरोप झाला. आज मला खूप आनंद होतोय की मी उद्धव ठाकरेंचा चेहरा घेऊन जिंकलोय. मोदींचा चेहरा न घेता जिंकलो याचा मला जास्त आनंद आहे, असे अरविंद सावंत यांनी म्हटले. 

दरम्यान, अरविंद सावंत हे सलग दोनवेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 2014 आणि 2019 अशी सलग दोनदा अरविंद सावंत यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला. त्यामुळे या मतदारसंघात अर्थातच ठाकरेंचं पारडं जड होतं. अखेर 2024 च्या निवडणुकीत अरविंद सावंत यांनी हॅटट्रिक केली आहे. अरविंद सावंत यांच्या विजयामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा हा दुसरा मोठा विजय आहे.