मुंबई : २०१९ची निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा देणाऱ्या शिवसेनेला राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढून जोरदार टोला हाणला. राज ठाकरेंच्या या व्यंगचित्राला आता शिवसैनिकांनी व्यंगचित्रातूनच प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरेंना प्रत्युत्तर देणारी दोन व्यंगचित्र शिवसैनिकांकडून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. 'तिळगूळ घ्या गोड बोला!' 'अरे माझे सगळे लाडू गेले कुठे?' असा टोमणा पहिल्या व्यंगचित्रातून मारण्यात आलाय. तर अंथरुण सोडण्याआधी कार्यकर्ते पक्ष सोडतायत, अशी बोचरी टीका दुसऱ्या व्यंगचित्रातून करण्यात आली आहे.
२०१९ची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काल शिवसेनेनं केली होती. शिवसेनेच्या या घोषणेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडेवर उद्धव ठाकरे असल्याचं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे. 'महाराष्ट्र सरकार(मधील एक) सादर करीत आहे (किती अंकी माहित नाही) परत सांगतो, सोडून जाईन! प्रयोग १९२(बहुदा)' असं या व्यंगचित्रात लिहिण्यात आलं आहे.
या व्यंगचित्रामध्ये उद्धव ठाकरे सोडू? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारतायत. त्यावर 'अहो पण, आम्ही कुठे धरलंय तुम्हाला' असं उत्तर फडणवीसांनी दिल्याचं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलंय.