Liquor Ban News: गुजरातसह महाराष्ट्राचा आणखी एक शेजारील राज्य आता दारुमुक्त होणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्यात दारुबंदीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मध्य प्रदेशची दारुबंदी विविध टप्प्यांमध्ये लागू केली जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने धार्मिक महत्व असलेल्या शहरात दारुबंदी लागू केली जाणार आहे. यानंतर बाकीच्या शहरांमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाईल.
कोणत्या ठिकाणी होणार दारुबंदी?
मध्य प्रदेश सरकारने 17 धार्मिक ठिकाणी दारुबंदीचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये एक महापालिका, सहा नगरपालिका, सहा नगर परिषद आणि चार ग्रामपंचायत क्षेत्रांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने उज्जैन महानगरपालिकांचा समावेश आहे. ज्यामध्ये दतिया, पन्ना, मंडला, मंदसौर, मैहर, नगर परिषद क्षेत्र ओंकारेश्वर, महेश्वर ओरछा, चित्रकूट, अमरकंटक या ठिकाणी दारुबंदी करण्यात आली आहे. असे देखील म्हटले जात आहे की, ज्या ठिकाणी दारुबंदी करण्यात आली आहे, त्या ठिकाणचे दारुचे दुकान इतर कोणत्याही ठिकाणी स्थलांतरित केले जाणार नाही.
मंत्र्यांना दिला 'हा' अधिकार
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले की, विशेष परिस्थितीत मंत्र्यांना त्यांच्या विभागातील बदल्या करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. याबाबतचे औपचारिक धोरण येत्या काळात आणले जाणार आहे. शुक्रवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीपूर्वी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी नर्मदा नदीच्या काठी बसून एक विशेष पूजा आणि आरती देखील केली. त्यानंतर सर्व मंत्र्यांनी महेश्वर येथील राणी अहिल्याबाई यांच्या गडाला भेट दिली. मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाची पहिली डेस्टिनेशन बैठक महेश्वर या ठिकाणी पार पडली. राणी अहिल्याबाई यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त ही सभा अयोजित करण्यात आली होती.
मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, वारसा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने राणी अहिल्याबाई यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.