मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून जागा शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या सुप्त तणाव निर्माण झाला आहे. जागावाटपावर एकमत न झाल्यास दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारीही सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून पुन्हा एकदा भाजपविरोधी सूर आळवण्यात आला आहे.
देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी काही दिवसांपूर्वी अर्थव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीवरून सरकारचे कान टोचले होते. मोदी सरकारने हेडलाईन मॅनेजमेंटमधून बाहेर पडून अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला होता. शिवसेनेने मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.
वृत्तपत्रांना देशातील परिस्थितीचे गांभीर्य असले तरी सर्व लोक सत्य परखडपणे छापत नाहीत किंवा दाखवत नाहीत. सरकारच्या सोयीचे मथळे किंवा बातम्या देतात. मोदी-शहांचे सरकार उत्तम काम करत आहे. त्यांनी काश्मीरमधील कलम ३७० हटवले. आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. आपले चांद्रयान-२ चंद्रावर जवळजवळ पोहोचलेच आहे. ते थोडेफार भरटकल्यानंतर पंतप्रधान मोदी इस्रोप्रमुख के.सिवन यांचे अश्रू पुसताना व धीर देतानाच्या हेडलाईन्स झाल्या. तरीही अर्थव्यवस्था आणि रोजगाराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे 'सामना'त म्हटले आहे.
तसेच बेताल विधाने करून अकारण वाद ओढवून घेणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष यांच्यावरही शिवसेनेने निशाणा साधला आहे. देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधक करतात. मात्र, आमच्या मंत्र्यांनी विज्ञानाचे कुळ आणि मूळ बदलून टाकण्याइतपत झेप घेतल्याचा खोचक टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
महाराष्ट्रात युती झाल्यास आणि न झाल्यास कुणाला किती जागा?
यापूर्वी लोकसभा निवडणुकीवेळी युतीची घोषणा झाल्यानंतर शिवसेनेचा भाजपविरोधी सूर अगदीच मवाळ झाला होता. मात्र, आजच्या अग्रलेखात शिवसेनेकडून पुन्हा एकदा मोदी-शहा जोडगोळीला थेट लक्ष्य करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा नवा हिंदुस्थान घडविण्यात स्वत:ला झोकून देत आहेत. त्यांनी देशाचा नकाशा विस्तारण्याचे ठरवले आहे. मात्र, नवा हिंदुस्थान घडवत असताना मागे कोसळणाऱ्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणारे हात दिसत नाहीत. मोदी-शहा अखंड हिंदुस्थान निर्माण करतील, पण लोकांच्या चुलीच विझत गेल्या तर काय करायचे, असा रोकडा सवाल शिवसेनेने अग्रलेखातून उपस्थित केला आहे.