'खाती कमी मिळाली तरी चालतील, पण मुख्यमंत्रीपद हवेच'

आपल्याला २५ वर्षे जुना मित्र तोडायचा नाही. मात्र, सर्व काही गोडीने झाले पाहिजे.

Updated: Nov 7, 2019, 02:33 PM IST
'खाती कमी मिळाली तरी चालतील, पण मुख्यमंत्रीपद हवेच' title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर झालेल्या आमदारांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती समोर येत आहे. आपल्याला २५ वर्षे जुना मित्र तोडायचा नाही. मात्र, आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम राहायचे, असे उद्धव यांनी सांगितल्याचे समजते. तसेच मुख्यमंत्रीपद पहिली अडीच वर्षे की नंतरची ते उद्धव ठाकरेच ठरवतील. भाजपने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता, असेही उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले.

'भाजप अल्पमतातील सरकार स्थापन करणार नाही, शिवसेनेशी चर्चा सुरु'

एकवेळ सरकारमध्ये कमी खाती मिळाली तरी चालतील पण कोणत्याही परिस्थितीत अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळालेच पाहिजे. भाजपसोबत जायचेच नाही, अशी आपली भूमिका नाही. मात्र, सर्व काही गोडीने झाले पाहिजे. अन्यथा इतर पर्यायांचा विचार करावा लागेल. भाजपने ताठर भूमिका सोडली तरच चर्चा होऊ शकते, असे उद्धव ठाकरे यांनी बैठकीत आमदारांना सांगितल्याचे समजते. 

'चर्चेची कोंडी तुम्ही निर्माण केली, आता तुम्हीच फोडा'

या बैठकीतील कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी सर्व आमदारांना मोबाईल फोन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना आणखी दोन दिवस मुंबईतच थांबण्यास सांगितले आहे. आता थोड्याचवेळात वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात शिवसेनेची आणखी एक बैठक होणार आहे.