मातोश्रीवरची बैठक संपली; शिवसेना आमदारांना मुंबईतच थांबण्याचे आदेश

शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतच थांबण्याचे आदेश

Updated: Nov 7, 2019, 01:45 PM IST
मातोश्रीवरची बैठक संपली; शिवसेना आमदारांना मुंबईतच थांबण्याचे आदेश title=

मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर झालेल्या शिवसैनिकांची बैठक नुकतीच संपली आहे. यानंतर मातोश्रीबाहेर पडलेल्या आमदारांनी अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुखच घेतील, एवढी माफक प्रतिक्रिया देत येथून काढता पाय घेतला. या बैठकीत काय झाले याविषयी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर देसाई यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीच्यावेळी जे ठरलं होतं, त्याप्रमाणे सगळे व्हावे, हेच उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा, ही सर्व आमदारांची इच्छा आहे. मात्र, अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. 

'भाजप अल्पमतातील सरकार स्थापन करणार नाही, शिवसेनेशी चर्चा सुरु'

या बैठकीवेळी सर्व आमदारांना मोबाईल फोन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. बैठकीतून बाहेर पडल्यानंतरही शिवसेनेच्या आमदारांनी फार काही बोलण्यास नकार दिला. मात्र, एकूणच आमदारांची देहबोली पाहता शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी कायम असल्याचे चित्र आहे. याशिवाय, शिवसेनेचे सर्व आमदार आणखी दोन दिवस मुंबईतच थांबणार असल्याचे समजते. यानंतर वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात शिवसेनेची आणखी एक बैठक होणार आहे.

भाजपचे आमदार जास्त; देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील- गडकरी

तर दुसरीकडे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार हे नेते राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. राज्यात स्थिर सरकार आणण्याच्यादृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. सरकार स्थापनेचा निर्णय हा राज्यपालांशी घटनात्मक तरतुदींवर चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल, असे मुनगंटीवारांनी काहीवेळापूर्वीच घेतलेल्या पत्रकारपरिषदेत सांगितले होते. त्यामुळे राज्यपालांच्या भेटीनंतर भाजप काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.