नवी मुंबईत नाईकांना शह देण्यासाठी पवारांची महाविकासआघाडीच्या नेत्यांसोबत बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फासे टाकायला सुरुवात केली आहे.

Updated: Feb 3, 2020, 08:12 PM IST
नवी मुंबईत नाईकांना शह देण्यासाठी पवारांची महाविकासआघाडीच्या नेत्यांसोबत बैठक title=

मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप नेते गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फासे टाकायला सुरुवात केली आहे. या निवडणुकीसंदर्भात आज मुंबईत महाविकासआघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि एकनाथ शिंदे हे नेते उपस्थित होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन गणेश नाईक यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. 

नवी मुंबईतील नाईक घराण्याच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतरच रणनीती आखायला सुरुवात केली होती. त्यानुसार शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे यांना नवी मुंबईत सक्रिय करण्यात आले होते. शशिकांत शिंदे गेल्या काही दिवसांपासून जातीने नवी मुंबईतील समस्यांमध्ये लक्ष घालत आहेत.  

नवी मुंबईतील गावठाणातील अनियमित बांधकांमे हा कळीचा मुद्दा आहे. ही बांधकामे नियमित व्हावीत, अशी मागणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीला प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी आजच्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे लवकरच यासंदर्भात महाविकासआघाडी सरकारकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मात्र, हा निवडणूक आणि मतांच्या राजकारणाचा विषय नाही. आम्ही लोकांना न्याय देण्यासाठी हे करत आहोत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष नवी मुंबईत एकत्रच लढणार आहेत. त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, असे शशिकांत शिंदे यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.