बारामतीचा 'बापमाणूस' ते महाराष्ट्राचा 'चाणक्य'... सर्वव्यापी शरद पवार

अनेक धक्के पवारांनी पचवले पण चेहऱ्यावरची रेष हलली नाही, किंवा कपाळावर आठी नाही.

Updated: Nov 26, 2019, 10:42 PM IST
बारामतीचा 'बापमाणूस' ते महाराष्ट्राचा 'चाणक्य'... सर्वव्यापी शरद पवार title=

मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात शरद पवार हे सर्व विरोधकांना अक्षरश: पुरून उरले. आपणच महाराष्ट्राचे चाणक्य असल्याचे त्यांनी पुन्हा एकवार सिद्ध केले. अँग्री ओल्ड यंग मॅन इन द वॉर शरद पवार यांनी विधानसभा निवडणूक एकतर्फी वाटत असताना पवारांनी निवडणूक फक्त एकहाती फिरवलीच नाही, ती जिंकलीसुद्धा. राष्ट्रवादीच्या जागा लक्षणीय वाढल्याच पण निवडणुकीच्या निकालानंतर झालेला पेच सर्वाधिक खुबीनं यशस्वीपणे हाताळला तो पवारांनीच. बारामतीच्या या बापमाणसानं डझनभर आव्हानं लिलया परतावून लावली.

१. चाणक्यनीतीचा अचूक वापर
२. भाजप, मोदी-शाहांना पवारांचा 'शह'
३. अजित पवारांचं बंड मोडून काढलं
४. कुटुंबातील, राष्ट्रवादीतील फूट टाळली
५. महाविकासआघाडीचे शिल्पकार ठरले पवार
६. सोनिया गांधींची मनधरणी करण्यात यश
७. बेरजेचं राजकारण करण्यात माहीर असलेल्या भाजपला महाविकासआघाडीचं संघटन दाखवून दिलं.  
८. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची मोट बांधली
९. दोन टोकांच्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आणून दाखवण्याची किमया पवारांची
१०. १६२ आमदारांचं महाशक्तिप्रदर्शन घडवलं
११. संभ्रमित आमदारांना विश्वास दिला
१२. कायदेशीर डावपेचात भाजप नेतृत्वावर कुरघोडी केली

या निवडणुकीनं न भूतो न भविष्यती असे क्षण अनुभवले. पण त्यामध्ये उठून दिसले ते लढवय्ये पण तितकेच संयमी पवार. 'ईडी'च्या गुन्ह्यापासून ते पुतण्यानं घर फोडण्यापर्यंत अनेक धक्के पवारांनी पचवले पण चेहऱ्यावरची रेष हलली नाही, किंवा कपाळावर आठी नाही. साम, दाम, दंड भेदाला मोडून काढत पवार जिंकले. ७९ व्या वर्षी हात पाय गुडघे दुखण्याच्या या वयात या माणसानं अख्खा अग्निपथ एकट्यानं पार केला.