Sanjay Raut On Raj Thackeray Amit Shah Meeting In Delhi: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सभागी होणार असल्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राऊत यांना त्यांनी पोस्ट केलेल्या राज ठाकरेंच्या व्यंगचित्रासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राज ठाकरेंना पुलवामा हत्याकांडासंदर्भात त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तर दिली असतील असं म्हटलं आहे.
राज ठाकरे आणि अमित ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्र्यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन राज ठाकरेंनी काढलेलं एक व्यंगचित्र पोस्ट केलं. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी, "मला त्या भेटीबद्दल माहिती नाही. मात्र राज ठाकरे हे एक उत्तम व्यंगचित्रकार आहेत. कलाकार आहेत. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे. त्यांच्या मनातल्या संवेदना आणि खंत इतर कोणापेक्षा मला जास्त माहित असतात. या देशाच्या स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक मोदी आणि शाहांच्या हातून कशाप्रकारे फासावर लटकवलं जात आहे अशाप्रकारचं एक उत्तम व्यंगचित्र त्यांनी मध्यंतरी काढलं होतं. ते मला खूप आवडलं. मी यात राजकारण पाहत नाही. त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या देशाच्या, महाराष्ट्राच्या भावना होत्या. काल जर त्यांची भेट झाली असेल तर नक्कीच त्यांनी त्यासंदर्भात चर्चा केली असेल," असं राऊत म्हणाले.
अप्रतिम!
अलीकडच्या काळातील मला सगळ्यात आवडलेले व्यंगचित्र!really great.
चित्रकार...सुप्रसिद्ध...
होऊ दे चर्चा!!!@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @narendramodi @AUThackeray @sardesairajdeep @RajThackeray pic.twitter.com/47ZKHcAqor— Sanjay Raut (@rautsanjay61) March 19, 2024
संजय राऊत यांनी अमित शाह आणि राज ठाकरे भेटीचा संदर्भ थेट पुलवामा हल्ल्याशी जोडला. "अनेकदा पुलवामासंदर्भात आपण विचार करतो, बोलतो आपली खदखद व्यक्त करतो. राज ठाकरेंनी यांनी एका भाषणात पुलवामा हत्येमागील रहस्य उघड केलं होतं. त्यात ते असं म्हणतात की, पुलवामा हत्याकांडाच्याआधी हिंदुस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार यांची बँकॉक येथे गुप्त भेट झाली होती. त्या गुप्तभेटीनंतर पुलवामा हत्याकांड घडलं का? मला असं वाटतं की कालच्या भेटीनंतर त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर अमित शाहांनी दिलं असेल," असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.
नक्की वाचा >> वसंत मोरेंचं थेट भाजपाला चॅलेंज! पुणेकरांचा उल्लेख म्हणाले, 'माझ्या उमेदवारीने काय...'
दरम्यान, कालच्या दिल्लीतील भेटीनंतर राज ठाकरे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करतील अशी पेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र राज यांनी आपली भूमिका अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहे. राज महायुतीबरोबर गेले तर भाजपाबरोबरच शिंदे गटालाही मराठी मतं मिळवण्यासाठी फायदा होईल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.