संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट

राज्यातला सत्तासंघर्ष हा शिगेला पोहोचला आहे.

Updated: Oct 31, 2019, 08:11 PM IST
संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट title=

मुंबई : राज्यातला सत्तासंघर्ष हा शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवारांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन संजय राऊत भेटले. पण ही भेट राजकीय नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपवर दबाव टाकण्यासाठी संजय राऊत शरद पवारांची भेट घेत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

दुसरीकडे शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याबाबत आघाडीच्या नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण सोनिया यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झालेत. त्यामुळे आता सोनिया गांधी काय भूमिका घेतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेसच्या नेत्यांनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. काँग्रेसने आधी भूमिका ठरवावी, सोनिया गांधींची परवानगी घ्यावी, असा सल्ला शरद पवारांनी काँग्रेसच्या या नेत्यांना दिला. शरद पवारांच्या या सल्ल्यानंतर काँग्रेस नेते दिल्लीला रवाना झाले आहेत.

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा हा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीवेळी युती करताना ठरला होता, असं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी मात्र असा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचं सांगितलं. त्यामुळे भाजप-शिवसेनेचे संबंध ताणले गेले. फडणवीसांनी असं वक्तव्य करायला नको होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजप-शिवसेनेचे संबंध ताणले गेले असतानाच आता काँग्रेस-राष्ट्रवादीने वेगळ्या हालचाली सुरु केल्या आहेत.