मुंबई : शिवसेना - भाजप यांच्यातील युतीचे नाते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. भाजप त्यासाठी पुढाकार घेत आहे. मात्र, स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेने भाजप विरोधात दंड थोपटले आहे. याचा प्रत्यय पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत दिसून आला. या निवडणुकीत सेनेने भाजपचा चांगलाच दम आणि घाम काढला. त्यामुळे ताळ्यावर आलेल्या भाजपने आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी खटाटोप सुरु केलाय. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' या निवासस्थानी भेट घेतली. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर तब्बल या भेटीसाठी ४ वर्षे लागले. तोपर्यंत त्यांना शिवसेना दिसली नाही, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. युतीचा धागा पकडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपला जोरदार फटकारे हाणलेत ते व्यंगचित्रातून.
राज यांनी मोदींनाही टोला लगावलाय. त्यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा आधार घेत 'भेट आणि मन की बात' या शिर्षकाखाली व्यंगचित्र सादर केलेय. यात दोन्ही नेते एकमेकांच्या पाठित खंजीर खूपसताना दाखविण्यात आलेय.