Saif Ali Khan Attacker Photo: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी रात्री चाकूहल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सैफ अली खानला सध्या लिलावती रुग्णालयात (Lilawati Hospital) दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे. सध्या त्याला आयसीयूत ठेवण्यात आलं आहे. दरम्यान सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयित हल्लेखोराचा फोटो समोर आला आहे. इमारतीच्या सीसीटीव्हीत त्याचा चेहरा कैद झाला आहे.
सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी वेगवेगळ्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 311, 312, 331(4), 331(6), 331(7) अंतर्गत केला गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दरोडा, प्राणघातक शस्त्रांसह दरोडा, घरात बेकायदेशीरपणे घुसणे (हाऊस ट्रेसपास), घरफोडी तसंच रात्रीच्या वेळी घोरपडी करण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. चोरीच्या उद्देशाने हल्लेखोर घरात घुसल्याचा पोलिसांना संशय आहे. हल्लेखोराची ओळख पटली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल असं वांद्रे पोलिसांनी सांगितलं आहे.
सहा वार झाल्यानंतर सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानने रक्तबंबाळ अवस्थेत सैफला लिलावती रुग्णालयात नेलं. इब्राहिमने लिलावती रुग्णालयात (Lilawati Hospital) जाण्यासाठी रिक्षाची मदत घेतली. कार तयार नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने वेळ वाचवण्यासाठी वडिलांनी रिक्षात बसवलं आणि रुग्णालय गाठलं. सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरापासून दोन किमी अंतरावर लिलावती रुग्णालय आहे.
सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न झाल्याचं त्याच्या टीमने म्हटलं आहे. पोलिसांनीही त्याला दुजोरा दिला आहे. चोरीच्या उद्देशाने सैफवर चाकू हल्ला झाल्याचं पोलीस म्हणाले आहेत. तसंच एका आरोपीची ओळख पटली असल्याचंही सांगितलं आहे.
हल्ल्याच्या दोन तास आधी सैफ अली खानच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कोणीही घरात प्रवेश केल्याचं दिसलेलं नाही. याचा अर्थ ज्याने अभिनेत्यावर हल्ला केला तो आधीच इमारतीत घुसला होता आणि हल्ला करण्याची वाट पाहत होता. अभिनेत्यावर चाकूने वार करून पळून गेलेल्या हल्लेखोराची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले आहेत.
पोलिसांना हल्लेखोर घरातील एका मोलकरणीशी संबंधित असावा, ज्याने त्याला अभिनेत्याच्या घरात प्रवेश दिला होता असा संशय असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान अभिनेत्यावरील हल्ल्यामुळे चित्रपटसृष्टीत भिती पसरली आहे. अभिनेत्री पूजा भट्टने म्हटलं आहे की, तिला कधीही इतकं असुरक्षित वाटलं नव्हते. तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वांद्रे येथे अधिक पोलिस बंदोबस्ताची विनंती केली आहे.
दुसरीकडे विरोधकांनी महायुती सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. जर सेलिब्रिटीच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचं काय? अशी विचारणा ते करत आहेत.