पार्थ नाराजी प्रकरण : शरद पवार मुंबईतून बारामतीला रवाना

पार्थच्या नाराजीबाबत कुटुंबियांमध्ये चर्चा होणार का ?

Updated: Aug 16, 2020, 11:53 AM IST
पार्थ नाराजी प्रकरण : शरद पवार मुंबईतून बारामतीला रवाना  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : शरद पवार यांच्या जाहीर वक्तव्याने दुखावले गेलेले पार्थ पवार सध्या बारामतीत आहेत. तर अजित पवारही बारामतीत असून शरद पवार मुंबईहून बारामतीला रवाना झाले आहेत. त्यामुळे आज पार्थच्या नाराजीबाबत कुटुंबियांमध्ये चर्चा होणार का ? याकडे लक्ष लागलंय. दरम्यान पार्थ पवार मागील दोन दिवस आपल्या नातेवाईकांच्या भेटीगाठी घेतायत. 

शुक्रवारी रात्री त्यांनी पुण्यात काका अभिजित पवार यांच्याशी चर्चा केली. तर काल बारामतीत काका श्रीनिवास पवार यांच्याशी चर्चा केली. श्रीनिवास पवार यांच्याशी चर्चा करून पार्थ बारामतीतच थांबले आहेत. विचार विनिमयाने यातून मार्ग निघेल अशी प्रतिक्रिया पवार कुटुंबियांकडून काल व्यक्त केली गेली आहे. त्यामुळे आज शरद पवार बारामतीत जात असल्याने कुटुंबात चर्चा होणार का याकडे लक्ष लागलंय.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण असो वा राम मंदिराचा विषय त्याबाबत पार्थने घेतलेली भूमिका चूक की बरोबर? हे ठरवता येणार नाही. त्याचप्रमाणे शरद पवारांनी व्यक्त केलेल्या मताविषयी प्रश्न उपस्थित करता येणार नाही. दोघेही त्यांच्या त्यांच्या जागी बरोबर असू शकतात. भूमिकांबाबत चूक, बरोबर ठरवता येवू शकत नाही. साहेबांचं कुटूंबातील ज्येष्ठत्व आणि वय याचाही विचार करायला हवा. या सगळ्यात पार्थ दुखावला जाणे स्वाभाविक आहे, मात्र अशा गोष्टी कुटुंबात घडत असतात. विचार विनिमयातून सर्व काही ठीक होईल. पार्थची नाराजी दूर होईल, असा विश्वास पवार कुटुंबातील सदस्याने व्यक्त केला आहे. मात्र त्यांनी या विषयावर कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय.

दरम्यान पार्थ पवार हेदेखील मीडियाशी बोलण्यास तयार नाहीत. आजची भेट कौटुंबिक असून त्यावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिलाय. पवार कुटुंबात अशा प्रकारचं वादळ आल्यास श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांची भूमिका महत्वाची ठरलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार श्रीनिवास पवार यांच्या मुंबईतील घरी जाऊन बसले होते.