मुंबई : सुरक्षिततेच्या कारणांवरुन बंद करण्यात आलेल्या पश्चिम रेल्वेवरील लोअर परेलचा रेल्वे हद्दीतील भाग पाडण्यासाठी २ आणि ३ फेब्रुवारीला रेल्वे तर्फे ११ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येण्याची शक्यता आहे. या दरम्यान लोअर परेल ते चर्चगेट मार्गावरील रेल्वे सेवा ११ तासांसाठी बंद करण्यात येऊ शकते. यामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कल्याण - परेल लोकल सुरु करण्यासाठी परेल स्थानकात कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच या परेल टर्मिनसचे उद्घाटन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे लवकरच येथून कल्याण - परेल लोकल सुटणार आहे. तसेच दादर स्थानकातील भार कमी होणार आहे. दादरमधून ३२ लोकल फेऱ्या कमी करुन त्या परेल स्थानकातून सोडण्याचा विचार सध्या सुरु आहे. तर दुसरीकडे सहा महिन्यांपूर्वी लोअर परळ उड्डाण पुल वाहतूकीसाठी बंद केल्यानंतर पश्चिम रेल्वेने नवा पुल बांधण्यासाठी टेंडरची प्रक्रिया सुरू केली आहे. दोन महिन्यात टेंडर निश्चित होऊन १२ महिन्यात हा नवा पुल बांधून पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जुन्या पुलाचे गर्डर व पिलर काढण्यासाठी फेब्रुवारीमध्ये मोठा ब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे अनेक उपनगरीय गाड्या आणि लांबपल्याच्या गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
नुकतीच नाशिकमार्गे सुरू करण्यात आलेल्या मध्य रेल्वेच्या नव्या राजधानीत प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचे ३६०डिग्री अंशातून व्हर्च्युअल रियालिटी दर्शन घडणार आहे. तसेच रेल्वेच्या इतिहासात प्रथमच हॉटस्पॉटद्वारे चालत्या ट्रेनमध्ये मोफत वायफाय कनेक्शन मिळणार असल्याने प्रवाशांचे जंगी मनोरंजनही होणार आहे.
राजधानीचे धुमधडाक्यात स्वागत होत असतानाच आता प्रवाशांना थेट व्हीआर सेट पुरविण्यात येणार असून त्यावर सीएसएमटी इमारतीच्या अंतरंगाचे देखणे व्हर्च्युअल रिलायालिटी दर्शन घेता येणार आहे. ही सुविधा एसी फर्स्टच्या प्रवाशांना मिळणार आहे. त्याबरोबरच प्रवाशांना चालत्या गाडीत हॉटस्पॉटवर मोफत वायफाय कनेक्शन देखील मिळणार आहे.
राजधानी नाशिकमार्गे जाताना बहुतेक स्थानकांवर तिच्या नियोजित वेळेच्या आधीच पोहोचत आहे. पहिलीच उद्घाटनाची गाडी नाशिकला ११ मिनिटे आधी, तर आग्रा येथे सकाळी ७.४४ वाजता म्हणजे १२ मिनिटे आधी पोहोचली. तर दिल्लीला हजरत निजामुद्दीन स्थानकात १६ मिनिटे आधी आली. येतानाही राजधानी सीएसएमटीला १८ मिनिटे आधी पोहोचली. त्यामुळे प्रत्येक स्थानकावर तिला जादा थांबा देण्यात आला. तिच्या नियोजित वेळत तिला सोडावे लागत असल्याने प्रत्येक स्थानकावर तिला जादा थांबा देण्यात आला. गाडी लवकर पोहोचण्याची वेळ जमेस धरल्यास ही गाडी आता साडे एकोणीस तासांऐवजी तिचा वेळ तास अर्धातास कमी करता येईल का, याचा विचार अधिकारी करीत आहेत.