मुंबई : गीतकार आणि लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तालिबान यामध्ये केलेल्या तुलनेमुळे नव्या वादाला सुरूवात झाली आहे. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थ करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच आहे', असं विधान जावेद अख्तर यांनी केलं होतं. (Javed Akhtar Taliban, RSS comment)
तालिबानी प्रवृत्ती रानटी असल्याचं सांगत त्यांनी तालिबानवर टीकेची झोड उठवली. याचवेळी भारताचं तालिबान कधी होऊ शकत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावरून आता रोष व्यक्त केला जात आहे. आमदार नितेश राणे यांनी जावेद अख्तरांवर घणाघात केला आहे. (Nitesh Rane on Javed Akhtar)
आजवर मुघल- अफगाणी अशा अनेक परकीय आक्रमणांचे दाह या भारतमातेने सहन केले आहेत. हिंदूधर्मावर, हिंदुसंस्कृतीवर आणि धर्मस्थळांवर वारंवार हल्ले करुन ते नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. तरी विशाल ह्रदय दाखवत आक्रमणकाऱ्यांनाही भारतभूमीनं समावून घेतलं. त्यांच्या कलाकृतींचे, साहित्य संस्कृतीचे जतन व संवर्धनही केले. त्यामुळेच आज या देशात अनेक पंथ, धर्म, संस्कृती आणि भाषा वाढल्या आणि नांदल्या. विशेषत: उर्दू लेखनाच्या तुमच्या कौशल्याचं भारतवासीयांनी नेहमी कौतूकच केलेलं आहे. धर्मविस्ताराच्या नावाखाली तलवारीच्या जोरावर एकाही हिंदू राजानं आजवर कुठल्याही देशावर आक्रमण केले नाही.
— nitesh rane (@NiteshNRane) September 6, 2021
तुम्ही तालीबान्यांची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी करणं हा एक सुनियोजित षडयंत्राचा भाग वाटतोय. कारण ही तुलना करताना तुम्ही तालीबानी प्रवक्त्यासारखी भूमिका घेत कुटनितीनं त्यांची तुलना हिंदुत्वाशी करताय. मला खरंतर हेच समजत नाही की तुम्हाला हिंदूधर्माविषयी एवढा राग का आहे? कदाचित कम्युनिस्ट विचारधारा असणाऱ्या तुमच्या सासरवाडीचा तुमच्यावर चांगलाच प्रभाव पडलेला दिसतोय.
हिंदूत्त्व मुळातच एक समतोल जीवनशैली आहे. सर्वप्रकारच्या उपासना पद्धती व श्रद्धांना इथं स्थान आहे. त्यामुळेच सहिष्णूता आणि घर्मानिरपेक्षता इथल्या हिंदूचा स्थायी स्वभाव आहे. त्यामुळंच तर सुप्रीम कोर्टानंही सांगितलंय की हिंदू ही एक जीवनपद्धती व शैली आहे आणि इथल्या संस्कृतीचा गाभा आहे. जो ही व्यक्ती या देशात राहतो, तो या देशाला आपली मातृभूमी समजून प्रेम करत असेल, इथल्या संस्कृतीशी एकरूप झाला असेल तो आमच्यासाठी हिंदू आहे, मग त्याचा धर्म व उपासना पद्धती कोणतीही असेल! हीच समरसतेची विचारधारा व पद्धती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे.
भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी देखील जावेद अख्तर यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी जावेद अख्तर यांच्या घरासमोर निदर्शने केली आहेत.