शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर नवी जबाबदारी, मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार

मिलिंद नार्वेकर यांच्यावर सोपवण्यात आलेल्या नव्या जबाबदारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे

Updated: Sep 16, 2021, 01:07 PM IST
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर नवी जबाबदारी,  मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार title=

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ओळख असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या नव्या बोर्डाची आज आंध्र प्रदेश सरकारने घोषणा केली. नव्या कार्यकारीणीत देशभरातील 24 व्यक्तींचा समावेश करण्यात आला असून महाराष्ट्रातून शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या नावाचाही समावेश आहे.

मिलिंद नार्वेकर यांची ट्रस्टचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जनमोहन रेड्डी यांच्याशी फोन वरुन संवाद साधला आणि मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केली. त्यानंतर आंध्र प्रदेश सरकारकडून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यामुळे आता मिलिंद नार्वेकर यांच्यावर नवी जबाबदारी आली आहे. 

नियुक्ती नंतर मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत आंध्र प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी निवड केल्याबद्दल आंध्र प्रदेश सरकार तसेच मला ही संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचा मी आभारी आहे. माझ्या हातून सेवा घडावी यासाठी देवानेच हे द्वार उघडले आहे. हे माझे भाग्य आहे.

मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाचीही त्यांच्याकडे जबाबदारी आहे.