'माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय...' छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं खास स्टाईलने उत्तर

माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, असं छगन भुजबळांनी आज भाषणात सांगितलं... यानिमित्तानं आठवण झाली ती राज ठाकरेंच्या जुन्या वक्तव्याची... शिवसेना सोडताना राज ठाकरेंनी हीच भावना बोलून दाखवली होती... 

राजीव कासले | Updated: Jul 5, 2023, 10:05 PM IST
'माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय...' छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं खास स्टाईलने उत्तर title=

Pawar vs Pawar : विठ्ठला... पाहतोयस ना...? राजकारण्यांनी तुझा कसा सोयीनं वापर सुरू केलाय...? शरद पवार (Sharad Pawar) म्हणजे राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांचा विठ्ठल... मात्र तब्बल 24 वर्षांची कारकीर्द घडवलेल्या या विठ्ठलाला सोडताना छगन भुजबळांनी (Chagan Bhujbal) खापर फोडलं ते बडव्यांवर.लोक म्हणतात शरद पवार यांचा फोटो का लावला, ते आमचे विठ्ठल (Vitthal) आहेत. विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. बडव्यांना दूर करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्हाला पोटाशी धरून आशीर्वाद द्यायला या. 2019मध्ये सकाळच्या शपथविधीवेळी शरद पवारांनी जी गुगली टाकली त्यात आपलाच गडी आऊट का केला, असा सवाल छगन भुजबळांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केला. तसंच पवारांना जसं वाईट वाटलं तसंच वाईट वसंतदादा पाटील, बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांनाही वाटलं असेल असं म्हणत भुजबळांनी थेट पवारांवर निशाणा साधलाय.

अर्थात पवार म्हणजे पवारच.. त्यांनीही आपल्या खास स्टाईलनं आपल्या या भोळ्या भक्ताला चांगलाच प्रसाद दिला. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारीला लोक जातात. उन्हातान्हातून, दगड-धोंड्यातून जातात. अंतकर्णात एकच भावना असते, विठ्ठलाचे दर्शन घेण्याची. पंढरपूरला पोहचल्यानंतर काहीवेळा मंदिरात सुद्धा जाता येत नाही. बाहेरून कळसाला नमस्कार करतात आणि आनंदाने पुढे जातात. पण त्यांनी कधी तक्रार केली नाही. विठ्ठल, गुरू म्हणायचं आणि आमच्याकडं दुर्लक्ष झालं, असं सांगायचं. ही मोठी गंमतीची गोष्ट आहे,' असा टोला शरद पवारांनी छगन भुजबळांना लगावला आहे.

भाजपसोबत जो गेला, तो संपला, असं म्हणत शरद पवारांनी इशारा दिलाय....चिन्ह जाऊ देणार नाही, असं आश्वासन पवारांनी दिलंय. तर त्यांचं नाणं चालणार नाही हे त्यांना माहीत आहे म्हणून त्यांनी माझा फोटो वापरला, असा टोलाही शरद पवारांनी अजित पवार गटाला लगावलाय. गेले त्यांची चिंता नको म्हणत पवारांनी अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली..... हा नवा नाराही शरद पवारांनी दिलाय.

पंढरपूरातली बडवे मंडळींची अरेरावी, हा तसा चर्चेचा विषय. मात्र राजकारणात विठ्ठल आणि बडवे मंडळींचा वाद सगळ्यात आधी चव्हाट्यावर आणला तो राज ठाकरेंनी. 18 डिसेंबर 2005 मध्ये कृष्णकुंज बाहेर जमलेल्या गर्दीत राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्याची घोषणा केली. त्यावेळी माझा वाद विठ्ठलाशी नाही, बडव्यांशी आहे म्हणत राज ठाकरे बाहेर पडले.

तेव्हापासून विठ्ठल आणि बडवे राजकारणात अजरामर झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक विठ्ठल झाले आणि अनेकांनी आपले विठ्ठल बदलले देखील. नेत्यांची सोय झाली. मात्र या सगळ्या राजकारणात कोंडी झाली ती सामान्य कार्यकर्त्यांची. विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती, असा संभ्रम त्यांना अजूनही सतावतोय.