सिंधुदुर्ग : काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना आपली भूमिका कळावी यासाठीच आपण आज बोलणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते नारायण राणे यांनी गोव्यात दाखल झाल्यानंतर दिली. त्यामुळं आता राणे कुडाळच्या मेळाव्यात काय बोलणार याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.
नारायण राणे गोव्याहून कुडाळकडे रवाना झाले आहेत. राणे समर्थकांसोबत रोड शो करत कुडाळकडे रवाना झाले आहेत. राणेंसोबत त्यांच्या पत्नी नीलम आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणेही आहेत. सिंधुदुर्ग राणेंचे होते आणि राणेंचेच राहणार असल्याचा विश्वास यावेळी नितेश राणेंनी व्यक्त केला. कुडाळला पोहल्यानंतर कार्यकर्च्यांचा मेळावा होणार आहे. सिंधुदुर्गात आज राणे पितापुत्रांनी भाजप प्रवेशाचा मूहुर्त ठरवण्याआधी चाचपणी सुरू केली आहे. यावेळी राणे काय बोलतात याकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
गेल्या आठवड्यात काँग्रेसनं सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी बरखास्त करून नवा जिल्हाध्यक्ष नेमला. त्यावेळी राणेंशी कुठलीही चर्चा करण्यात आली नाही. त्यामुळे नाराज राणेंनी आता भाजप प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. पण पक्षात राहून स्वपक्षीय माजी मुख्यमंत्र्यावर टीका करण्यासाठी प्रसिद्ध असलेला राणेंचा आक्रमकपणा भाजपमध्ये प्रवेश केल्यावर फडणवीस कितपत सहन करणार या प्रश्नांच्या उत्तरावरच राणेंच्या पुढील वाटचालीची अनेक गणित उलगडणार आहेत.