मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत वारंवार बाष्कळ बडबड करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेले, तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्यसैनिक आणि संपूर्ण देशाचा अवमान करत आहे. कंगणाच्या वक्तव्यांना प्रसिद्धी देऊन माध्यमांनी तिला व्यासपीठ उपलब्ध करुन देऊ नये ही आमची विनंती आहे असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
कंगनाच्या विधानावर बोलताना पटोले म्हणाले की, कंगना जी बडबड करत आहे ती भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्य लढ्याला बदनाम करण्याच्या कुटील डावाचाच भाग आहे. याला भाजपचाही पाठिंबा आहे असा आमचा आरोप असून भाजपने याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी.
पद्मश्री सारखे पुरस्कार किती स्वस्त झाले आहेत, ते आपल्याला पाहिला मिळतंय अशी टीका करत ज्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा कराव्यात हा देशातील जनतेसमोर प्रश्न उभा राहिला आहे असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
कंगनाने केलेल्या वक्तव्याविरोधात कायदेशीर कारवाईबाबत आम्ही विचार करत आहोत, आमच्या कायदेशीर सल्लागार सेलशी देखील याबाबत चर्चा केली आहे असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसंच याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे, आता कायदेशीर कारवाई करु असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
कंगनाचं वादग्रस्त वक्तव्य
कंगना रणौतनं 'भिख मे मिली आजादी' या विधानानंतर आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळी तिने राष्ट्रपिता महात्मा गांधींवर निशाणा साधला आहे. कंगना रणौतने सोशल मीडियावर महात्मा गांधींना भुकेले आणि धूर्त संबोधणारी पोस्ट शेअर केली आहे. 'भगतसिंग यांना फाशी द्यावी', अशी महात्मा गांधींची इच्छा होती, असेही तिने म्हटले आहे.