हत्या आणि आत्महत्या! एअर होस्टेसचा खून 'त्या' कारणासाठीच? पाहा नेमकं काय घडलं

Mumbai Air Hostess Murder Case : मुंबईतील एअर होस्टेस हत्या प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय आहे. एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीनं अंधेरीमधील पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आत्महत्या केली. त्यामुळे या प्रकरातील गुढ कायम आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 9, 2023, 04:55 PM IST
हत्या आणि आत्महत्या! एअर होस्टेसचा खून 'त्या' कारणासाठीच? पाहा नेमकं काय घडलं title=

Mumbai Air Hostess Murder Case : एअर होस्टेस रुपल ओग्रेची (Rupal Ogrey) गळा चिरून निर्घृण हत्या करणारा आरोपी विक्रम अटवालला पोलिसांनी अटक केली. पण अंधेरी पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये असलेल्या विक्रमनं शुक्रवारी सकाळी आत्महत्या केली (Accused Suicide in Police Custody). रुपलची हत्या केल्याची कबुली तिच्याच बिल्डिंगमध्ये साफसफाईचं काम करणाऱ्या विक्रमनं दिली होती. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. शुक्रवारी त्याला कोर्टात हजर केलं जाणार होतं. मात्र त्याआधीच पोलीस लॉकअपमध्ये हाफ पँटनं त्यानं गळफास लावून घेतला. पोलीस ठाण्यातच आरोपीनं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडालीय.

हवाई सुंदरीची गळा चिरून हत्या 
रुपल ओग्रे ही मूळची छत्तीसगडमधील रायपूरची. हवाई सुंदरी (Air Hostess) असलेली रुपल मरोळ अंधेरीमध्ये भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होती. गेल्या सोमवारी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला रुपलचा मृतदेह पोलिसांना आढळला. पवई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना बिल्डिंगमधील सफाई कामगारांची चौकशी केली. त्यावेळी विक्रम अटवाल या सफाई कामगाराच्या अंगावर नखांच्या खुणा दिसल्या. त्यानंतर विक्रमनं आपल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली

हत्येचा रचला होता कट
आरोपी विक्रमने 3 सप्टेंबर रोजी गळ्यावर वार करून  23 वर्षीय एअरहोस्टेस रूपल ओग्रेयची हत्या केली. आरोपी विक्रम हा त्याच इमारतीत करायचा साफ सफाईचं काम करत होता. हत्येच्या दोन दिवस आधी दोघांमध्ये वाद झाला होता. चेहरा आणि हातावरील जखमांमुळे पोलिसांचा आरोपीवरील संशय बळावला होता. कसून चौकशी केली असता आरोपीने आपला गुन्हा कबुल केला. विक्रमने एअरहोस्टेस रुपलची हत्या केल्यानंतर  चाकू आणि त्यादिवशी घातलेले कपडे हे इमारतीच्या झुडुपांमध्ये फेकले. विक्रमला अटक करण्यात आल्यानंतर 8 सप्टेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. एअरहोस्टेसची हत्या करण्यापूर्वी तीन दिवस आधीच विक्रमने चाकू विकत घेतला होता असा पोलिसांना संशय आहे. आरोपी विक्रमचं लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुलं आहेत.

हत्येंच गुढ कायम
विक्रमची रूपलवर बऱ्यच दिवसांपासून नजर होती. रूपलने त्याला बाथरूमचा चोकअप झालेला पाईप साफ करण्यासाठी बोलावलं होतं. हीच संधी साधत त्यानं रूपलवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असावा असा संशय पोलिसांना आहे.. रुपलच्या हत्येनंतर काहीच घडलं नाही, अशा आविर्भावात विक्रम वावरत होता... आता त्यानंही आत्महत्या करून जीवन संपवल्यानं या हत्येमागचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही.