मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; घराबाहेर पडताना घ्या काळजी

Mumabai Local : मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा.

Updated: Sep 9, 2023, 04:14 PM IST
मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; घराबाहेर पडताना घ्या काळजी title=

Railway Mega Block : जर रविवारी तुम्ही घराबाहेर पडणार असाल किंवा लोकलने बाहेर जाण्याचा प्लान असेल तर हा रेल्वेचे वेळापत्रक (Mumbai Local) नक्की पाहा. कारण रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, 10 सप्टेंबर रोजी लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर सीएसएमटी-विद्याविहार अप- डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या ब्लॉकच्या दरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकाच्या दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांच्या दरम्यान थांबून विद्याविहार स्थानकावर डाऊन धिम्या मार्गावर वळवल्या जातील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वेवर पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पनवेल येथून ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल आणि पनवेल येथून ठाण्याकरिता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल रद्द राहणार आहेत. तसेच नेरुळहून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स हार्बर लाइन सेवा आणि ठाणे येथून नेरुळकरिता डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट - मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील सर्व लोकल सेवा जलद मार्गावर चालवल्या जातील. याशिवाय ब्लॉकच्या दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहणार आहेत.