मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडले. मात्र, कोणत्या राजयकीय पक्षात जायचे यावर एकमत होत नव्हते. काय करायचे, असा त्यांच्यापुढे प्रश्न होता. काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस. यात कोणाची निवड करायची? पण काही केल्या निर्णय होत नव्हता. त्यावेळी चिठ्ठी टाकून त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी किस्सा सांगितला. नारायण राणे यांच्या ‘झंझावात’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
शिवसेना सोडल्यानंतर राणे यांच्यासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पर्याय होते. यापैकी कोणत्या पक्षात जायचे हे निश्चित होत नव्हते. त्यामुळे त्यांनी चिठ्ठ्या टाकून निर्णय घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी दोन चिठ्ठ्या तयार केल्या, एकात काँग्रेस आणि दुसऱ्या चिठ्ठीत राष्ट्रवादी काँग्रेस असे लिहिले. चिठ्ठी उचलल्यानंतर ती काँग्रेसचे नाव असल्याचे उघडल्यानंतर समजले. त्यानंतर राणे यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेत पक्षात प्रवेश केला, असे पवार यांनी सांगितले. दरम्यान, नारायण राणे यांनीच आपल्या पुस्तकातच याची माहिती दिल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नारायण राणे अत्यंत विश्वासू सहकारी होते. ठाकरे यांच्यावर जेव्हा अडचणी आल्या तेव्हा राणे यांनी त्या सोडवल्या. मुळात राणेंचा अन्याय सहन न करण्याचा स्वभाव असल्याने शिवसेनेत कोंडी होऊ लागली. त्यानंतर राणे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला, असे पवार म्हणालेत. राणे हे सामान्य घरातून आलेले आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे. राणे यांनी संसदेतही आपली छाप सोडली आहे. राणे यांनी अर्थसंकल्पावर केलेल्या भाषणाची प्रत आपण मागवून घेतली आणि ती वाचल्याची आठवण यावेळी शरद पवार यांनी सांगितली.
राणे यांना मुख्यमंत्रीपदासाठी केवळ नऊ महिन्यांचाच कालावधी मिळाला, जर त्यांना पूर्ण काळ मिळाला असता तर त्यांनी आपल्या कामाची नोंद घ्यायला भाग पाडले असते, अशा शब्दात शरद पवार यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले. कोणतीही कौटुंबिक, राजकीय पार्श्वभूमी नसताना, घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना आणि सामाजिक ओळख नसताना, राजकीय क्षेत्रात पाऊल टाकून धडाडी आणि कार्यक्षमतेच्या जोरावर कर्तृत्व सिद्ध केल आहे. महाराष्ट्रातील थोडक्या नेत्यांमध्ये नारायण राणेंचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, असे पवार म्हणालेत.