Big News : रविवारी मुंबईत फिरण्याचे बेत आखताय? ही बातमी वाचूनच बाहेर पडा

प्लान करण्यापूर्वी एकदा हा नवा नियम लक्षातच ठेवा

Updated: Mar 26, 2022, 12:43 PM IST
Big News : रविवारी मुंबईत फिरण्याचे बेत आखताय? ही बातमी वाचूनच बाहेर पडा title=

मुंबई :  सुट्टीच्या दिवशी मुंबईचं एक वेगळंच रुप पाहायला मिळतं. इथं वर्षानुवर्षांपासून या शहराला वाढताना पाहिलेल्या मंडळींपासून ते अगदी पहिल्यांदाच मुंबईत येणारे, समुद्र पाहणारेही अनेक चेहरे हमखास दिसतात. हे शहर आहेच तसं, सर्वांना आपलंसं करणारं आणि भुरळ पाडणारं. याच शहरात आता काही नियम बदलले आहेत. जे जाणून घेणं सर्वांसाठीच महत्त्वाचं आहे.

मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत 27 मार्चपासून प्रत्येक रविवारी शहरातील काही मुख्य रस्त्यांवर अंशत: किंवा पूर्णपणे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. प्राथमिक स्वरुपात ही वेळ सकाळी 6 ते सकाळी 10 वाजेपर्यंत असेल.

(Mumbai Traffic Police) मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं नाव ‘संडे स्ट्रीट’ असं आहे. या उपक्रमाची सुरुवात मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी केली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी रविवारच्या दिवसाची सुरुवात ट्रॅफिक फ्री होणार असल्याचं म्हटलं आहे. मुंबईतील रिकाम्या रस्त्यांवर तुम्ही स्केटिंग, सायकलिंग आणि इतरही मनोरजनाचे कार्यक्रम करु शकतात असं सांगितलं.

सध्या या उपक्रमाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे. पांडे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर लगेचच काही नवख्या उपक्रमांची सुरुवात केली.

याचाच एक भाग म्हणजे ‘संडे स्ट्रीट’. दरम्यान, सदर उपक्रमासाठी मुंबईतील ज्या रस्त्यांवर वाहतुक बंद असणार आहे, त्यामध्ये मरीन ड्राईव्ह, लिंकींग रोड, माईंडस्पेस, कार्टर रोड, मुलुंड आणि बीकेसीतील रस्त्यांचा समावेश आहे.

सदर उपक्रमाला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशी आशा पांडे यांनी ट्विट करत व्यक्त केली.