रिस्पेक्ट! अ‍ॅम्ब्युलन्सची वाट न पाहता पोलीस हवालदाराने महिलेला उचलून पोहचवलं रुग्णालयात

Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून तैनात असलेल्या संदीप वाकचौरे यांनी एका वृद्ध महिलेचा जीव वाचवला आहे. मुंबई पोलिसांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 

आकाश नेटके | Updated: Aug 18, 2023, 01:29 PM IST
रिस्पेक्ट! अ‍ॅम्ब्युलन्सची वाट न पाहता पोलीस हवालदाराने महिलेला उचलून पोहचवलं रुग्णालयात title=

Mumbai News : पोलीस म्हटलं अनेकांना त्यांना मदत करण्यासाठी कचरतात. मात्र पोलीस हे आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सेवेसाठी सदैव कार्यरत असतात. अनेकदा त्याचा प्रत्यय देखील येतो. असाच काहीसा प्रकार मुंबईत (Mumbai) देखील पाहायला मिळाला आहे. अपघातात जखमी झालेल्या वृद्ध महिलेला वाचवण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सची वाट न पाहता पोलीस हवालदाराने (Mumbai Police) स्वतःच तिला रुग्णालयात पोहचवलं आहे. पोलीस हवालदाराच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मुंबई पोलिसांनीही ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे. 

मुंबई पोलिसांनी ट्वीट करत हवालदार संदीप वाकचौरे यांचा फोटो शेअर केला आहे जे जखमी महिलेला रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांची वर्दीतली माणुसकी पुन्हा एकदा दिसून आली आहे. 

नेमकं काय घडलं?

बुधवारी रात्री एक 62 वर्षीय वृद्ध महिला आपल्या पतीला भेटण्यासाठी जात होती. त्यावेळी रस्ता ओलांडत असताना तिला दुचाकीने जोरदार धडक दिली. लोकमान्य टिळक रोड येथे दुचाकीने वृद्ध महिलेला धडक दिली होता. या अपघातात वृद्ध महिली जखमी झाली होती. हे पाहून पोलीस हवालदार संदीप वाकचौरे तातडीने तिच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता तिला जवळच्या जी.टी. रुग्णालयात नेले. संदीप वाकचौरे यांनी तात्काळ महिलेला रुग्णालयात दाखल केल्याने तिला जास्त कोणतीही दुखापत झालेली नाही. तसेच या वृद्ध महिलेचा जीव वाचला आहे.

मुंबई पोलिसांनी केले ट्वीट

"नेहमी ड्युटीवर! 16 ऑगस्ट रोजी पतीला भेटण्यासाठी दवाखान्यात जात असलेल्या 62 वर्षीय महिलेला रस्ता ओलांडत असताना दुचाकीने धडक दिली. ड्युटीवर असलेले पोलीस हवालदार संदीप वाकचौरे यांनी ताबडतोब तिच्या मदतीसाठी धाव घेतली आणि रुग्णवाहिकेची वाट न पाहता तिला जवळच्या रुग्णालयात नेले आणि तिचा जीव वाचवला," असे मुंबई पोलिसांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

ही माहिती समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी वाकचौरे यांचे कौतुक केले आहे. पोलीस हवालदार संदीप वाकचौरे यांना माझा सलाम. ग्रेट. ब्राव्हो, असे एका युजरने म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने गुड जॉब मुंबई पोलीस, असे म्हटलं आहे. दुसर्‍या व्यक्तीने कौतुक करत, मला आशा आहे की आयुक्तांनी कॉन्स्टेबल वाकचौरे यांचे कौतुक केले असेल ज्यांच्यामुळे एका महिलेचा जीव वाचवला आहे, असे म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात एका बेपत्ता झालेल्या मुलाचा मुंबई पोलिसांनी अवघ्या 26 मिनिटांमध्ये शोध लावला होता. जुलै महिन्यात हा सगळा प्रकार घडला होता. मावशीने दिलेल्या तक्रारीनंतर वडाळा पोलिसांनी काही मिनिटांमध्येच बेपत्ता मुलाचा शोध घेऊन त्याला कुटुंबियांकडे सोपवले होते. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले होते. मुंबईतील  वडाळा पोलिसांनी हरवलेल्या मुलाची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या 26 मिनिटांत हरवलेली 3 वर्षीय मुलगा सापडला होता.

मुलगा सोबत असताना अचानक बेपत्ता झाल्याचे मावशीने पोलिसांना सांगितले होते. तक्रारीची गंभीर दखल घेत, बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी सर्व बीट मार्शल आणि गस्त घालणाऱ्या वाहनांना याबाबत कळवण्यात आले. वडाळा पोलिसांच्या हद्दीतील पोलिसांचे सर्व बीट मार्शल आणि वडाळा पूर्वेकडील चिंधी गली परिसरात व वडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आसपासच्या परिसरात हरवलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी मोबाईल वाहने तैनात करण्यात आली होती. त्यानंतर तपासादरम्यान, बीट क्रमांक 1 वर नियुक्त मार्शल राजकिरण उत्तम बिलासकर यांना वडाळा येथील रेहमानिया मशिदीजवळ उभा असलेली मुलगा दिसला. बिलासकर यांनी मुलाजवळ जाऊन त्याला आपल्या ताब्यात घेतले आणि कुटुंबियांच्या स्वाधिन केले.