मध्य रेल्वेवर प्रवास करण्याआधी ही बातमी वाचा; नाहूर-मुलूंड दरम्यान पॉवर ब्लॉक, कधी आणि किती वाजता?

मध्य रेल्वेने (Central Railway) नाहूर (Nahur) आणि मुलुंडदरम्यान (Mulund) पॉवर ब्लॉकची (Power Block) घोषणा केली आहे. यादरम्यान, हा रेल्वे मार्ग पूर्णपणे बंद असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर ही  बातमी वाचाच..    

शिवराज यादव | Updated: Aug 18, 2023, 12:53 PM IST
मध्य रेल्वेवर प्रवास करण्याआधी ही बातमी वाचा; नाहूर-मुलूंड दरम्यान पॉवर ब्लॉक, कधी आणि किती वाजता? title=

मध्य रेल्वेने (Central Railway) नाहूर (Nahur) आणि मुलुंडदरम्यान (Mulund) पॉवर ब्लॉकची (Power Block) घोषणा केली आहे. यादरम्यान, हा रेल्वे मार्ग पूर्णपणे बंद असणार आहे. नाहूर आणि मुलुंडदरम्यान एका रोड ओव्हर ब्रीजचं बांधकाम सुरु आहे. या ब्रीजसाठी दोन गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यासाठीच या ट्राफिक आणि पॉवर ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या मदतीने रोड ओव्हर ब्रीजचं रुंदीकरण करत रस्ते वाहतूक कोंडी सोडवत ती सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे. 

पॉवर ब्लॉक कधी घेण्यात येणार आहे?

शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री हा ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्यरात्री 1 वाजून 20 मिनिटांनी हा ब्लॉक सुरु होईल. सकाळी 4 वाजून 20 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक सुरु राहील. या ब्लॉकदरम्यान, सर्व सहा मार्ग बंद असणार आहेत. यामुळे मुलुंड ते विक्रोळी दरम्यानच्या अप आणि डाऊन जलद आणि धीम्या मार्गांवर ब्लॉकचा परिणाम होणार आहे. गर्डरच्या अचूक आणि सुरक्षित कामासाठी विंच आणि पुली पद्धतीचा वापर केला जाणार आहे.

रेल्वेवर होणार परिणाम 

या कामामुळे उपनगरीय रेल्वे सेवा तात्पुरत्या रद्द केल्या जातील. ब्लॉकपूर्वी कल्याणच्या दिशेने सुटणारी शेवटची कर्जत लोकल 12:24 वाजता असेल. त्याचप्रमाणे ब्लॉकनंतर सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल कल्याणहून पहाटे ३.५८ वाजता सुटेल.

लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही होणार परिणाम

ट्रेन क्रमांक 11020 - भुवनेश्वर- सीएसएमटी मुंबई कोनार्क एक्स्प्रेस ठाण्यापर्यंतच असेल
ट्रेन क्रमांक 12810 हावडा- सीएसएमटी मुंबई मेल दादरपर्यंतच असेल.

खालील ट्रेन आपल्या ठरलेल्या वेळेच्या 40 ते 60 मिनिटं उशिराने असतील

ट्रेन नंबर 18030 शालीमार - एलएलटी एक्स्प्रेस
ट्रेन नंबर 18519 विशाखापट्टणम - एलएलटी एक्स्प्रेस
ट्रेन नंबर 20104 गोऱखपूर - एलटीटी एक्स्प्रेस
ट्रेन नंबर 12702 हैदराबाद - सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस

वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, प्रशासनाने सध्या असणाऱ्या रोड ओव्हर ब्रीज उड्डाणपुलाची क्षमता वाढवण्यासाठी व्यापक प्रकल्प सुरू केला आहे. सध्याच्या उड्डाणपूलांची रचना, रस्त्यांवरील वाढती वाहनं गरज पूर्ण करण्यात असक्षम ठरत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासन दोन टप्प्यांत धोरणात्मक विस्तार करत आहे.