मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील "खट्टेमीठे" संबंध सगळ्यांनाच माहिती आहेत. कधी एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढणं, कधी टोमणं मारणं तर कधी एकमेकांवर राजकीय कुरघोडी करणं. महाराष्ट्राच्या राजकारणात हे काही नवीन नाही... तुझ माझं जमेना.... असं म्हणतंही या बहीणभावांमधला जिव्हाळा मात्र कायम असतो.
आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमातही याचीच प्रचिती आली. निमित्त होतं डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या रूग्णालयाच्य़ा कार्यक्रमाच्या उद्घाटनाचं. हा कार्यक्रम डोळ्यांशी संबंधित असल्यानं 'लेन्स' या शब्दाचा आधार घेऊन पंकजा मुंडे यांनी चांगलीच फटकेबाजी केली.
व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांबाबत लेन्स या शब्दावरून शाब्दीक कोटी करताना पंकजा मुंडे यांनी सद्यस्थितीत शरद पवार यांच्यासारख्या अनुभवाच्या राजकीय लेन्सेस दुसऱ्या कोणाकडेही नसल्याचं म्हटलं.
मुंडे महाजनांच्या लेन्सेसमधून स्वत:ला मोठं करत आज पवार साहेबांच्या लेन्समधून पाहण्याचं भाग्य खूप कमी लोकांना लाभलंय आणि त्यापैकी एक म्हणजे धनंजय मुंडे असा पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा कौतुकाने उल्लेख केला आणि अर्थात टाळ्याही मिळवल्या.
आपल्या बहिणीने केलेल्या या जाहीर कौतुकाची परतफेड म्हणून आपल्या भाषणासाठी उठताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेना प्रेमाने टपली मारली.
आपल्या भाषणातही त्यांनी आपल्या नात्याचा हळूवारपणे उल्लेख केला. आपल्याला व्यवहारातलं काही कळंत नाही. ही गोष्ट दुसऱ्या कुणाला जरी माहिती नसली तरी आपल्या बहिणीला मात्र माहिती असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
राजकारणात पक्के विरोधक असलेले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पण मुंबईतल्या कार्यक्रमातले हे प्रेमळ टोमणे सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आहेत.
बीडमधील कट्टर राजकीय शत्रू असलेले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे कोणत्याही कार्यक्रमात एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्याची संधी सोडत नाहीत. त्यातच व्यासपीठावर एकत्र असताना त्यांनी थेट केलेल्या टीका अनेकदा मनोरंजन करणाऱ्या ठरतात. मुंबईतल्या या कार्यक्रमातील त्यांचे हे परस्पर टोमणेही सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही आवर्जून शेअर केला जात आहे.