यंदा मुंबईची तुंबई नाही! BMC सज्ज; अधिकाऱ्यांचा दावा

हिंदमाता परिसरात पाणी तुंबणार नाही या साठी पालिकेनं कंबर कसली आहे  

Updated: May 18, 2022, 05:08 PM IST
यंदा मुंबईची तुंबई नाही! BMC सज्ज; अधिकाऱ्यांचा दावा  title=

मेघा कुचिक झी मीडिया, मुंबई:  पावसाळ्यात मुंबईकरांना अनेक त्रासाला सामोरे जावं लागतं. तासंतास ट्राफिक जाम, ट्रेनचा खोळंबा, तुंबलेलं पाणी असं काहीस चित्र मुंबईचं पावसाळ्यात असतं. मुंबईचं हार्ट समजल्या जाणाऱ्या दादरमधल्या हिंदमाता परिसर थोड्याथोडक्या पावसात तुंबून जातो. मुंबईचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादर हिंदमाता परिसरात पाणी तुंबल्याने मुंबईकर हैराण होऊन जातो. पण आता हे चित्र बदलणार असल्याचा दावा मुंबई मनपाने केलाय. हिंदमाता परिसरात पाणी तुंबणार नाही या साठी पालिकेनं कंबर कसली आहे. 

पाणी न तुंबण्यासाठी कशी उभारली आहे यंत्रणा

'हिंदमाता परिसरात यंदा पाणी तुंबणार नाही. मुंबई मनपा यासाठी संपूर्ण सज्ज' असल्याचं पालिकेचे उपायुक्त संजय महाले यांनी म्हटलंय. मुंबई मनपाने एक मोठी यंत्रणा उभी केली आहे. हिंदमाता परिसरापासून जवळ असणाऱ्या सेंट झेवियेर्स मैदानात दोन भल्या मोठ्या टाक्या जमिनीखाली बांधल्या आहेत. तसंच प्रमोद महाजन उद्यानात देखील दोन टाक्यांची निर्मिती केली आहे. तर दुसरीकडे हिंदमाता परिसरातली पुलाखाली नऊ पंपांची उभारणी केली आहे. हिंदमाता परिसरात पावसाळ्यात पाणी तुंबल्यानंतर हे नऊ पंप सुरु केले जातील. त्यानंतर या नऊ पंपद्वारे सर्व पाणी बांधण्यात आलेल्या 4 टाक्यांमध्ये सोडण्यात येईल. त्यामुळे या परिसरात पाणी तुंबणार नाही आणि वाहतूक सुरळीत सुरु राहिल असं सांगण्यात आलंय

बांधण्यात आलेल्या टाक्यांची क्षमता नेमकी आहे किती? 

सेंट झेवियर्स मैदानात उभारण्यात आलेल्या नव्या टाकीची क्षमता 1 कोटी 80 लाख लीटर इतकी आहे. तर याच मैदानात असणाऱ्या जुन्या टाकीची क्षमता 1 कोटी 3 लाख लीटर इतकी आहे. हिंदमात परिसरापासून जवळ असणाऱ्या प्रमोद महाजन उद्यानात बांधण्यात आलेल्या पहिल्या टाकीची क्षमता 1 कोटी 62 हजार लीटर क्षमतेची आहे. तर दुसऱ्या टाकीची क्षमता 2 कोटी लीटरची आहे. यामुळे यंदा पाणी तुंबणार नाही अशी अपेक्षा.

 
हिंदमाता, तुंबणारं पाणी आणि नागरिकांचा त्रास

अनेकदा पालिकेकडून सांगण्यात आलंय की. हिंदमाता आणि आसपासच्या परिसराची भौगोलिक रचना एखाद्या बशी सारखी आहे. त्यामुळे या परिसरात थोडा पाऊस पडला तरी या परिसरात पाणी तुंबतं. आणि मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतं. याच परिसरात कपड्याची अनेक दुकानं आहेत. त्यामुळे येथे खरेदीसाठी ग्राहकांची नेहमीच गर्दी असते. पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त होतात. येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग गेला आहे. मुंबईतल्या महत्त्वाच्या रस्त्यांपैकी हा एक मार्ग आहे. हाच मार्ग पुढे मुंबईच्या पूर्व उपनगरांना जोडला गेला आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची रहदारी असते. पावसाळ्यात येथे पाणी तुंबल्यास एका मोठ्या भागावर वाहतुकीची कोंडी होते. पर्यायी वाहतूक वळवावी लागते. त्यामुळे इतर ठिकाणच्या वाहतुकीवर मोठा ताण येत असल्याचं देखील दिसून आलं आहे. 

मात्र पालिकेकडून तयार करण्यात आलेल्या या यंत्रणेमुळे यंदा मुंबईकरांची पावसाळ्यातील त्रासापासून मुक्तता होईल हीच अपेक्षा.