Crime News : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) मुंबई झोनच्या अधिकाऱ्यांनी डोंगरी (Dongri) येथून कार्यरत असलेल्या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी 50 कोटी रुपयांचे 20 किलो मेफेड्रोन (mephedrone) जप्त केले आहे. एनसीबीने या रॅकेटमधील तीन सदस्यांनाही अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी गुप्त माहितीच्या आधारे आंतरराज्यीय ड्रग तस्करी (drug racket) सिंडिकेट समोर आणले आहे.
एनसीबी मुंबईने डोंगरी येथून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश केला आणि डोंगरी येथून 50 कोटी रुपये किमतीचे 20 किलो मेफेड्रोन, 1,10,24,000 रुपये रोख आणि 186.6 ग्रॅम सोने जप्त केले आहे. या प्रकरणात डोंगरी येथून एका महिलेसह प्रमुख सदस्यांना अटक करण्यात आली. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक अमित घावटे यांनी शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, 'मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, जे अमली पदार्थांच्या तस्करीच्या आर्थिक उत्पन्नातून मिळवले होते.' मुंबई महानगर प्रदेशातील विविध भागात मेफेड्रोनची मोठ्या प्रमाणात तस्करी आणि अमली पदार्थाचे वितरण करण्यात सक्रियपणे गुंतलेल्या या गटाची माहिती एनसीबीला मिळाली होती.
एनसीबीच्या मुंबई झोन युनिटला डोंगरी भागात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीची माहिती मिळाली होती. त्यानंतर एनसीबीला एन खान आणि डोंगरी येथील त्याच्या घरात मोठ्या प्रमाणात साहित्य असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे 9 जून रोजी, एनसीबीच्या अधिकार्यांनी एन खानच्या ठिकाण्यावर छापा टाकला. त्याच्याकडून सुरुवातीला 3 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. त्यानंतर खानच्या घराची झडती घेतली असता त्यातून आणखी 2 किलो जप्त करण्यात आले. खानने चौकशीमध्ये डोंगरी येथील एएफ शेख या महिलेबाबत माहिती दिली.
NCB-Mumbai bursts major drug trafficking syndicate from Dongri. 20 kgs Mephedrone worth Rs 50 crores seized from Dongri in multiple search operations, 3 key members of syndicate arrested. Rs.1,10,24,000 cash recovered. 186.6 gms of gold ornaments were also seized: NCB pic.twitter.com/d5ozELyno4
— ANI (@ANI) June 10, 2023
त्यानंतर अधिकाऱ्यांनी महिलेला शोधून तिच्या घराची झडती घेतली. झडतीदरम्यान 15 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. याशिवाय 1,10,24,000 रुपये रोख आणि 186.6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सुरुवातीला चौकशीदरम्यान महिलेने तपासात दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सक्तीने चौकशी केली असता महिलेने गुन्ह्याची कबुली दिली.
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "तिन्ही आरोपींच्या चौकशीत ते गेल्या 7-10 वर्षांपासून या अवैध तस्करीच्या व्यवसायात गुंतल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलेचे अनेक शहरांमध्ये नेटवर्क होते आणि ती कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात व्यवहार करत होती. तिने ड्रग्जची तस्करी आणि त्याचे आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी एक कंपनी देखील सुरु केली होती. या सिंडिकेटमधील काही सदस्यांवर यापूर्वीच एनडीपीएस कायदा 1985 च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता."