Uddhav Thackeray On PM Modi: शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्यभरात आज आंदोलन विरुद्ध आंदोलन असं चित्र दिसतंय. महाविकास आघाडीने आज सरकारविरोधात जोडे मारो आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यानुसार मुंबईतल्या हुतात्मा चौकात आंदोलनाला सुरुवातही केलीय. यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केलीय. मग्रुरीने महाराष्ट्राची माफी मागू नका, असे ते मोदींना म्हणाले. कशा कशाची माफी मागणार? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
मविआचं आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांचीही मोठी कुमक परिसरात तैनात आहे.मविआच्या महत्त्वाच्या नेत्यांसह कार्यकर्ते हुतात्मा चौकात उपस्थित आहेत. तर दुसरीकडे मविआ राजकारण करण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचा आरोप करत महायुती राज्यभरात आंदोलन करतेय. मुंबई, पुणे, संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीविरोधात बॅनर हातात घेत , काळे झेंडे दाखवत महायुतीकडून हे आंदोलन केलं जातंय.
आज आपल्या मनातील संताप व्यक्त करण्यासाठी हे ठिकाणं निवडलंय. छत्रपती शिवरायांच्या साक्षीने बेकायदेशीररित्या बसलेल्या सरकारला गेट आऊट ऑफ इंडिया, असे ही जनता म्हणत आहे. मोदींनी माफी मागितली ती कशाची? पुतळा पडला त्याची? भ्रष्टाचार झाला त्याची? असा प्रश्न त्यांनी विचारला. लोकसभा निवडणुकीआधी तुम्ही घाईघाईत, भ्रष्टाचार करुन महाराजांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती. हात लावेन तिथे सत्यानाश करतात, अशी टीका त्यांनी पंतप्रधानांवर केली. तुम्ही कशा कशाची माफी मागणार? राम मंदिर गळतंय त्याची मागणार? असा प्रश्न त्यांनी विचारला.
महाराष्ट्राची मग्रुरीने माफी मागून चालणार नाही, असेही ते म्हणाले. छत्रपतींचा मान सर्वांनी राखला पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती शाहू महाराजांनी यावेळी दिली.
महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावर मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जनताच यांना जोडे मारेल असे मुख्यमंत्री म्हणाले. यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवू द्यायचा नाहीय. ती योजना यांना बंद करायची आहे, असे ते म्हणाले.