मुंबईत मास्क वापरला नाही तर अटक होणार

 कोरोनाचा फैलाव आता वेगानं होत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलं आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरला नाही तर थेट अटक केली जाणार आहे.

Updated: Apr 8, 2020, 05:22 PM IST
मुंबईत मास्क वापरला नाही तर अटक होणार title=

मुंबई :  कोरोनाचा फैलाव आता वेगानं होत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलं आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरला नाही तर थेट अटक केली जाणार आहे.

कोरोनाचा फैलाव मुंबई शहरात झपाट्यानं होत असल्यानं मुंबई महानगर पालिकेनं हा कठोर निर्णय घेतला आहे. मुंबईत कोणत्याही कारणानं घराबाहेर पडलेल्या व्यक्तिला आता मास्क घालणं बंधनकारक आहे. वैयक्तिक,  कार्यलयीन किंवा कुठल्याही कामासाठी सार्वजनिक ठिकाणी गेल्यास मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी चांगला घरगुती मास्क वापरला तरी चालेल. पण मास्क वापरणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

कार्यालयीन बैठकांनाही कर्मचाऱ्यांना मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे. यापुढे अशा ठिकाणी मास्क वापरला नाही तर थेट अटक करण्यात येणार आहे.

मुंबईत दिवसेदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आणि कोरोनाचे सर्वाधिक बळी मुंबईमध्येच गेले आहेत. लॉकडाऊन असलं तरी अनेक ठिकाणी लोक सोशल डिस्टसिंग आणि संचारबंदीचे नियम पाळताना दिसत नाहीत. धारावीसारख्या भागात तर कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतरही लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असल्याचं चित्र दिसत होतं.

 

ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, तो परिसर सील करण्यात आला आहे. या भागांमध्ये नागरिकांना संचारबंदी असून अगदी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळल्यानं शहरात कोरोना आणखी झपाट्यानं पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच आता सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आला असन या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला अटक करण्याची कठोर कारवाई करण्यात येणार आहे.