गिरणगावामध्ये 'चिंतामणी'च्या आगमन सोहळ्यात हुल्लडबाजी

 हुल्लडबाजांनी भारतमाताजवळील सुशोभिकरण केलेल्या बेटाची नासधूस केली.

Updated: Sep 9, 2018, 02:38 PM IST

मुंबई : आगमनाधीश असं बिरूद मिरवणाऱ्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीच्या आगमन सोहळ्याला रविवारी हुल्लडबाजीचं गालबोट लागलं... चिंतामणीच्या आगमन सोहळ्यासाठी रविवारी हजारोंची गर्दी उसळली होती. या गर्दीतल्या काही हुल्लडबाजांनी भारतमाताजवळील सुशोभिकरण केलेल्या बेटाची नासधूस केली.

स्थानिकांमध्ये नाराजी 

या ठिकाणच्या दुभाजकावर लष्करी सैनिक आणि पोलिसांच्या कर्तृत्वाची गुणगान करणारी, सर्वधर्म समभाव तसंच अन्य सामाजिक संदेश देणारी शिल्पं उभारण्यात आली होती. मात्र आगमन सोहळ्याला आलेल्या अतिउत्साही तरूणांनी या शिल्पांची मोडतोड केली.

या सगळ्या प्रकाराबाबत स्थानिक लालबागकर जनतेमध्ये प्रचंड नाराजी पसरलीय. आगमन सोहळ्याला येऊन धांगडधिंगा करणारे बहुसंख्य तरूण-तरूणी बाहेरचे होते, असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. 

वाहतुकीचे तीनतेरा

या गर्दीला आवर घालण्यात पोलीस यंत्रणा अपुरी पडली. अनेक तास लालबागच्या रस्त्यावरून चाललेल्या या मिरवणुकीमुळं वाहतुकीचेही तीनतेरा वाजले... धक्कादायक बाब म्हणजे चिंतामणी गणपती मंडळानं यंदाच्या वर्षी तब्बल ५५ हजार टी शर्टसची विक्री केली होती.

त्यामुळं एवढ्या मोठ्या संख्येनं गर्दी जमणार, याचा अंदाज मंडळाला होता. तरीही गर्दीला नियंत्रित करण्यासाठी मंडळानं काहीच उपाययोजना आखली नव्हती, हे या प्रकारातून समोर आलंय.