मुंबई : मेट्रो कारशेडवरुन (Metro Car Shed) जोरदार विरोधकांकडून राजकारण करण्यात येत आहे. त्यावेळी भाजपच्या (BJP) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारकडून केंद्राकडे मुंबईतील कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा (Mumbai Kanjurmarg Metro Car Shed) प्रस्ताव पाठविण्यात आला होता. यावेळी जागा सर्वात उपयुक्त असल्याचा दावा त्यांच्या पत्रातूनही करण्यात आला होता. आताच ही जागा उपयुक्त कशी नाही, असा थेट सवाल काँग्रेस (Congress) प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant)यांनी विचारला आहे.
दरम्यान, आरे येथील मेट्रो कारशेडचे काम महाविकास आघाडी सरकारने थांबवले आहे. जंगल तोडीला लोकांचा तीव्र विरोध होत असल्याने मेट्रो कारशेड दुसरीकडे हलविण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले होते. त्यानंतर सत्तेत आल्यानंतर जंगल वाचविण्यासाठी आणि लोकांचा विरोध लक्षात घेत आरे येथील कारशेड दुसरीकडे हलविण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्यानुसार कांजूरमार्ग येथे ही कारशेड बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तर केंद्र सरकारने या जागेवर दावा केल्याने हा कारशेड प्रकल्प वादात सापडला. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे.
कांजूरमार्गमधल्या मेट्रोकारशेडच्या जागेवरुन प्रचंड घमासान सुरू झाले आहे. कारशेडसाठी कांजूरमार्गचीच जागा उपयुक्त असल्याचे पत्र, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच दिले होते, असा दावा काँग्रेसने केला आहे. तर कांजूरमार्गमधल्या कारशेड़च्या जमिनीवरुन भाजपने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे. लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर भविष्यातल्या घोटाळ्याची काँग्रेसबरोबर पायाभरणी करताय का, असा सवालही भाजपने केला आहे. तर ही जागा राज्य सरकारच्याच मालकीची आहे. मिठागर आयुक्तांचे दावे अनेकवेळा फेटाळलेत, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार समर्थन करत सांगितले आहे.