Video : ...आणि विंटेज पद्मिनी तिची झाली; बालपणीचं स्वप्न साकार करणारी तरुणी सोशल मीडियावर तूफान व्हायरल

Viral Video : विंटेज गाड्यांप्रती प्रेम असेल आणि आजही रस्त्यानं अशी एखादी कार गेल्यावर तुमची नजर वळत असेल, तर हा व्हिडीओ पाहाच...    

सायली पाटील | Updated: Jan 10, 2025, 11:50 AM IST
Video : ...आणि विंटेज पद्मिनी तिची झाली; बालपणीचं स्वप्न साकार करणारी तरुणी सोशल मीडियावर तूफान व्हायरल  title=
Bengaluru Woman Fulfills Childhood Dream With Vintage Padmini Car watch video

Viral Video : पद्मिनी, इम्पाला, अॅम्बेसेडर या आणि अशा गाड्या 60-80 च्या दशकांदरम्यान अनेकदा पाहायला मिळाल्या. या कारचे रंग, त्यांची कमाल लांबी आणि एकंदर आकार कारप्रेमींच्या मनात कायमस्वरुपी घर करून गेला. अशीच एखादी कार आपल्याकडेही असावी, असं स्वप्नही अनेकांनीच पाहिलं असावं. पण, काळ आणि परिवहन विभागाचे नियम बदलले आणि या अनेक कार दिसेनाशा होत गेल्या. काही मंडळींनी मात्र या कारना जतन करत, त्यांचा सांभाळ केला आणि आजही ही माणसं मोठ्या रुबाबात या कार रस्त्यावर फिरवताना दिसतात. 

अशाच एका कारवर आपला प्रचंड जीव असल्यानं अखेर बालपणीपासूनच्या या स्वप्नाला तरुणपणी सत्यात उतरवण्याची किमया बंगळुरूच्या एका तरुणीनं केली आहे. भारतात एक काळ गाजवणारी आणि श्रीमंतांच्या आलिशान जीवनशैलीचं प्रतीक असणारी प्रिमियर पद्मिनी ही कार आपल्याकडेही असावी असं रचना महादिमाने या तरुणीला कायम वाटायचं आणि नुकतंच स्वत:च्याच वाढदिवसाला तिनं हे स्वप्न साकार केलं. हा आनंदाचा क्षण तिनं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सर्वांसमोर आणला. 

कैक वर्षांपासून ही कार आपल्यापाशी असावी अशी इच्छा मनी बाळगणाऱ्या रचनानं अखेर ती मिळवली. शून्यापासून या कारला पुन्हा आकार मिळाला, तिच्या दुरूस्तीचं काम करण्यात आलं आणि सुरेख अशा Powder Blue रंगात ती रंगवण्यात येत ही विंटेज कार आणि या कारची चावी अखेर रचनाला मिळाली. प्रबळ इच्छाशक्ती असली की स्वप्न साकार होतात हाच सुरेख संदेश रचनानं तिच्या या अनुभवातून एका सुरेख व्हिडीओसह नेटकऱ्यांपुढे मांडला. 

हेसुद्धा वाचा : ...तर नवी कार खरेदी करणं अशक्यच; सरकारच्या नव्या धोरणामुळे होऊ शकतो अनेकांचा स्वप्नभंग

सोशल मीडियावर रचनाचा हा व्हिडीओ कमाल व्हायरल झाला आणि तो अनेकांनीच रिशेअरही केला. मुख्यत्वे 90 च्या दशकातील मुलांनी हा व्हिडीओ शेअर करत या विंटेज कारवर कौतुकाचा आणि प्रेमाचा वर्षाव केला. तर, काही ज्येष्ठांनी आपल्याकडे ही कार होती तेव्हाच्या आठवणींनाही उजाळा दिला. ही विंटेज कार पाहून तुम्हाहा कोणतं दुसरं मॉडेल आठवतंय का?