मुंबई : मुंबईतल्या दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क (Shivaji Park) इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मीनताई ठाकरे यांच्या पुतळ्याचं वीज कनेक्शन कापण्यात आलं आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून या पुतळ्यांना सुशोभीकरण म्हणून लायटिंग करण्यात आली होती. बेस्ट म्हणजेच BOMBAY ELECTRIC SUPPLY & TRANSPORTचं मीटर या पुतळ्यांना असलेल्या लायटिंगसाठी घेण्यात आलं होतं. मात्र, महानगर पालिकेने लाईट बिल न भरल्यामुळे आता मीटर काढण्यात आलं आलं आहे. बेस्ट (BEST) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पालिकेला यासंदर्भात अनेकदा सांगूनही पालिकेने बिल न भरल्याने ही कारवाई करण्यात आली.
कायमस्वरुपी विद्युत रोषणाई?
दादर इथल्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, मीनताई ठाकरे पुतळा आणि मैदान परिसरात कायमस्वरुपी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या प्रकल्पाचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 2021 मध्ये करण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या आमदार निधीतून विद्युत रोषणाईचा हा प्रकल्प साकारण्यात आला होता.
शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारुढ पुतळा सन 1966 मध्ये उभारण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या आमदार निधीतून सुमारे सव्वा कोटी लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प साकारला आहे. यामध्ये पाच वर्षांचा देखभाल खर्चदेखील समाविष्ट आहे. ही रोषणाई कायमस्वरुपी आहे. तसेच स्वयंचलित व रंग बदलत्या स्वरुपाची आहे, असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा सर्व बाजुंनी विद्युत रोषणाईने उजळावा यासाठी रंग बदलणारे एलईडी प्रोजेक्टर दिवे लावण्यात आले आहेत. पुतळ्याच्या चारही बाजुस जळती मशाल भासेल, अशारितीने दिवे बसविण्यात आले आहेत. तसेच उद्यानात एलईडी स्पाईक दिवे लावले आहेत.
पुतळ्याच्या आजुबाजूच्या पदपथाची शोभा वाढवण्यासाठी 42 बहुरंगी एलईडी ग्लोब दिवे बसविले आहेत. मैदान परिसरातील सात प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक भित्तीचित्रं, दीपस्तंभ आणि मीनाताई ठाकरे पुतळा या सर्व ठिकाणी एलईडी विद्युत दिवे लावण्यात आले आहेत. ही सर्व विद्युत रोषणाई करण्यासाठी दिव्यांसह इतर सर्व साहित्य हे इटली येथून नेरी या आंतरराष्ट्रीय कंपनीकडून मागविले आहेत.
पण आता ही वीज जोडणी बंद करण्यात आली आहे.