कर्जत-जामखेडचं 'रामा'यण! नियोजित कटात माझा बळी गेला, राम शिंदेंचे अजित पवारांवर गंभीर आरोप

अजित पवार यांनी महायुतीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप राम शिंदे यांनी केलाय. राम शिंदे यांच्या आरोपांमुळे महायुतीत नव्या 'रामा'यणाला सुरुवात झालीय.

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 25, 2024, 08:14 PM IST
कर्जत-जामखेडचं 'रामा'यण! नियोजित कटात माझा बळी गेला, राम शिंदेंचे अजित पवारांवर गंभीर आरोप title=

Ram Shinde On Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीत आपल्याविरोधात कट रचल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. अजित पवार आणि रोहित पवार यांच्यामध्ये छुपी युती असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. अजित पवार यांच्या छुप्या मदतीमुळेच रोहित पवार यांचा विजय झाला असल्याचा दावा राम शिंदे यांनी केला आहे. अजित पवार यांनी महायुती धर्म पाळणं अपेक्षित होते. मात्र, अजित पवार यांनी महायुतीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. राम शिंदे यांच्या आरोपामुळे महायुतीत नव्या 'रामा'यणाला सुरुवात झाली आहे. 

कराडच्या प्रितीसंगमावर नेमकं काय घडलं? 

अजित पवार आणि रोहित पवार या काका-पुतण्यात जवळपास दीड वर्षांत असा खुमासदार संवाद पाहायला मिळाला. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी रोहीत पवार कराडच्या प्रितीसंगमावर गेले होते. रोहित पवार तिथून परतत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार प्रितीसंगमावर आले होते. 

यावेळी अजित पवार यांनी राजकारण बाजूला ठेऊन रोहित पवार यांचा हात हातात घेतला. काकांच्या अधिकारवाणीनं पायापड असं देखील अजित पवार यांनी रोहित पवार यांना सांगितलं. त्यानंतर अजित पवार म्हणाले, रोहित थोडक्यात वाचलास, जामखेडमध्ये एक सभा झाली असती तर तुझं काय झालं असतं असं अजित पवार रोहित पवारांना म्हणाले. या वाक्यावरुन आता मोठं 'रामा'यण सुरु झालंय. 

जामखेडमध्ये काका-पुतण्यांची छुपी युती असल्याचा आरोप कर्जत जामखेडचे भाजप उमेदवार राम शिंदे यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या विरोधात अजित पवार यांना सभेसाठी आपण चार ते पाच वेळा बोलावले पण अजित पवार आले नाहीत असा आरोप राम शिंदे यांनी यावेळी केला आहे. त्याचा पुरावा म्हणून त्यांनी काही एसएमएसही माध्यमांना दाखवले आहेत. 

राम शिंदेंना गैरसमज झाल्याचा राष्ट्रवादीचा दावा

पवार कुटुंबानं रचलेल्या कटाचा आपण बळी ठरल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला. राम शिंदे यांचा अजित पवार यांच्याबाबत काही गैरसमज झाल्याचा दावा राष्ट्रवादीनं केला आहे. त्यानंतर राम शिंदे यांनी केलेले आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. या आरोपांमुळे भाजप आणि राष्ट्रवादीत अविश्वासाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.