Elephanta Boat Accident: 'त्या' प्रवाशाच्या तक्रारीवरुन नेव्हीवर गुन्हा दाखल; बोट नेमकं कोण चालवत होतं हे गूढ कायम?

Elephanta Caves Boat Accident: गेटवे ऑफ इंडिया येथून दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास नीलकमल नावाची बोट 120 प्रवाशांना घेऊन एलिफंटाकडे निघाले आणि तिथेच घात झाला. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 19, 2024, 07:46 AM IST
Elephanta Boat Accident: 'त्या' प्रवाशाच्या तक्रारीवरुन नेव्हीवर गुन्हा दाखल; बोट नेमकं कोण चालवत होतं हे गूढ कायम? title=
Mumbai Boat Accident navy speedboat rammed into Mumbai ferry fir on navy speed boat

Elephanta Caves Boat Accident: मुंबईजवळील एलिफंटा येथे जाणाऱ्या निलकमल प्रवासी बोट दुर्घटना प्रकरणी नेव्हीच्या पेट्रोलिंग स्पीड बोटीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पीड बोटवरील चालक आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. ज्या व्यक्तीने बोट धडकली तो व्हिडीओ काढला त्याच व्यक्तीची FRI नोंदवून घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेटवे ऑफ इंडिया दुर्घटनेप्रकरणी आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 बेपत्ता असून 2 गंभीर जखमी आहेत. 

मुंबई जवळील एलिफंटा येथे जाणाऱ्या निलकमल प्रवासी बोट दुर्घटना प्रकरणी नेव्हीच्या पेट्रोलिंग स्पीड बोटीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ज्या व्यक्तीने बोट धडकली तेव्हाचा व्हिडीओ शूट केला तो प्रवासी नाथाराम चौधरी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पीड बोटवरील चालक आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झालाय. दरम्यान ती नेव्ही स्पीड बोट नेव्हीने टो करून नेली असून पोलिसांकडून त्या बोटीची पाहणी आणि तपासणी करण्यात येणार आहे.

नौदलाच्या स्पीड बोट विरोधात नीलकमल बोट दुर्घटनेसंदर्भात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये सीआर क्र 283/24 अन्वये 106(1), 125 (अ) (ब), 282, 324 (3)(5) BNS नुसार एफआयआर नोंदवण्यात आला असून स्पीड बोट चालक आणि जबाबदार इतरांवर सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेव्ही स्पीड बोट मध्ये एकूण सहा जण होते त्यातील तिघे मृत असून 1 जण गंभीर आहे. तर दोघांची स्थिती स्थिर असून यातील नेमकी स्पीड बोट कोण चालवत होतं? हे अद्याप नेव्हीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. या दुर्घटनेत एकूण 13 मृत्यू, 2 जखमी, 2 बेपत्ता असून एकूण 90 हुन जास्त जणांवर विविध रुग्णालयात उपचार करण्यात आला आहे. 

उरणमध्ये 57 जखमी प्रवाशांना डिस्चार्ज

मुंबई येथील गेटवे ऑफ इंडियायेथून एलिफंटाकडे जाताना बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत उरणमधील जेएनपीटी रुग्णालयात एकूण 58 अपघातग्रस्त प्रवाशांना दाखल करण्यात आले होते. यामधील 57 प्रवाशांची प्रकृती स्थिर असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये दोन जर्मन येथील परदेशी प्रवाशांचा देखील समावेश होता. तर यामध्ये एका सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. निधेश राकेश अहिरे असं या मयत मुलाचं नाव असून त्याच्या आई-वडिलांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. राकेश नानाजी अहिरे (वय 34) व हर्षदा राकेश अहिरे (वय 31) अशी आई-वडिलांची नावं असून ते नाशिक जिल्ह्यातील बसवंत, पिंपळगाव येथील रहिवासी होते. तर मुंबई येथे अहिरे कुटुंबीय पर्यटनासाठी आले होते.