MPSC भरती घोटाळा प्रकरणी सरकार विरोधात तीव्र आंदोलन

  एमपीएससी भरती गैरव्यवहाराप्रकरणी कारवाईसाठी पुणे ते मुंबई असा लाँग मार्च 

Updated: May 25, 2018, 08:09 PM IST

मुंबई :  एमपीएससी भरती गैरव्यवहाराप्रकरणी कारवाई करण्याच्या मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी पुणे ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आला. हा लाँग मार्च आझाद मैदानात पोहचल्यावर आंदोलक विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात धरणं आंदोलन सुरू केलं आहे.  गुरुवारी रात्री हा लाँग मार्च मुंबईच्या वेशीवरच अडवून पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं होतं. एआयएसएफ या विद्यार्थी संघटनेच्या वतीनं हा लाँग मार्च काढण्यात आला. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियाही आंदोलनस्थळी पोहचल्या. MPSC कडून नियमित आणि जादा पदांच्या जाहिराती निघत नसल्यानं स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-या मुलांनी यापूर्वीही राज्यभर आंदोलनं केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हे आंदोलन केलं जातं असल्याचे त्यांनी सांगितले. 

MPSC घोटाळा उघड होऊनही गंभीर कारवाई नाही, सरकारचे दुर्लक्ष, भरती रॅकेटवर कारवाईच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. एमपीएससी भरती गैरव्यवहाराप्रकरणी सरकारकडून अद्याप ठोस कारवाई होत नसल्याने हतबल असलेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांनी अखेर आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. पुण्यापासून मुंबईपर्यंत पायी निघालेला विद्यार्थ्यांचा मोर्चा आज मुंबईत दाखल झालाय. मुंबईतील आझाद मैदानावर हे मोर्चेकरी विद्यार्थी बसले असून ते सरकारकडे न्याय मागत आहेत. भरती रॅकेटमार्फत शासकीय सेवेत भरती झालेल्या हजारो अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि प्रामाणिकपणे एमपीएससीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. एमपीएससीमधील भरती घोटाळा उघडकीस करणारा तरुण योगेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा पायी मोर्चा पुण्यापासून मुंबईपर्यंत काढण्यात आला आहे.

सरकारी नोकर भरती भ्रष्टाचार विरोधी संघर्ष समितीमार्फत हा मोर्चा काढण्यात आला आहे. भरती घोटाळ्यात कारवाईबरोबरच, शासनातील रिक्त जागा भरण्याची मागणी, केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यातील परीक्षा पारदर्शक व्हाव्यात अशा मागण्या हे मोर्चेकरी करत आहेत.