मनसेची 'हनुमान चालिसा' तर, शिवसेनेच्या धनुष्यात हा 'रामबाण'

मनसेची 'हनुमान चालिसा'तर, शिवसेनेचं हे उत्तर 'रामबाण'ठरेल का?  

Updated: Apr 15, 2022, 05:47 PM IST
मनसेची 'हनुमान चालिसा' तर, शिवसेनेच्या धनुष्यात हा 'रामबाण' title=

मुंबई :  उद्याच्या हनुमान जयंतीला मनसे (MNS) आणि भाजपनं (BJP) भोंगे लावून हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी हनुमान चालिसाचं सामूहिक पठण देखील होणार आहे.

तर भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी मुंबईतील मंदिरांत मोफत भोंग्यांचं वाटप सुरु केलं आहे. हनुमान जंयती निमित्त मुंबईतील मंदिरांमध्ये 1 हजाराहून अधिक भोंग्यांचं वाटप केलं जाणार आहे. 

मनसेच्या हनुमान चालिसाला आता शिवसेनेनंही (Shiv Sena) उत्तर दिलं आहे. हनुमान जयंतीनिमित्ताने शिवसेनेकडून मुंबईतल्या अनेक मंदिरांमध्ये महाआरती केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शहरात ठिकठिकाणी अशा महाआरती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

दादरच्या पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिरामध्येही उद्या संध्याकाळी  वाजता महाआरती केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे आमदार आणि शाखाप्रमुख यांना आदेश दिले आहेत, ज्या ज्या ठिकाणी प्रसिद्ध हनुमान मंदिरं आहेत, त्या मंदिरात शिवसेनेच्या वतीने हनुमान जयंती साजरी केली जावी. 

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही पुण्यात हनुमान जयंतीचा प्रसाद मुस्लीम बांधवांच्या हस्ते वाटला जाणार असल्याचं सांगितलं आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्तेत आल्याने शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याची टीका होत आहे. त्यातच मनसेने हिंदुत्त्वाचा मुद्दा हातात घेत त्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे हिंदुत्त्ववादी मतं हातून जाऊ नये यासाठी आता शिवसेनेनंही कंबर कसली आहे.