मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या निकालावरून पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत. अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार असून त्यांनी विकासाचा मुद्दाच सर्वाधिक असल्याचं अधोरेखित केलंय.
अरविंद केजरीवाल यांचं सर्वाच स्तरावरून कौतुक होत असताना महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी देखील ट्विट करून दिल्लीकरांच कौतुक केलं आहे. या ट्विटमध्ये सुभाष देसाई यांनी महाराष्ट्राचं चित्र देखील समोर आणलं आहे. 'महाराष्ट्राने दिशा दाखवली आणि दिल्लीकरांनी स्विकारली'
महाराष्ट्राने दिशा दाखवली, दिल्लीकरांनी स्वीकारली!#DelhiElectionResults #DelhiElection2020 #DelhiPolls2020 #DelhiResults
— Subhash Desai (@Subhash_Desai) February 11, 2020
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील अरविंद केजरीवाल यांच कौतुक केलं आहे. दिल्लीतील 'आम आदमी पक्षा'च्या (आप) विजयाने अरविंद केजरीवाल यांनी देशाला 'जन की बात' दाखवून दिली, असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. यामध्ये केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे. तर भाजपचे अक्षरक्ष: तीनतेरा वाजले आहेत.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भाजपला चिमटे काढले. आपण म्हणजेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोडला. दिल्लीतील जनतेने 'मन की बात' नव्हे तर 'जन की बात' आता देशात चालणार हे दाखवून दिले. तथाकथित राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा 'झाड़ू'समोर टिकाव लागला नाही, अशी जळजळीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.