#DelhiResults2020: 'देशात 'मन की बात' चालणार नाही, हे दिल्लीकरांनी दाखवून दिले'

तथाकथित राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा 'झाड़ू'समोर टिकाव लागला नाही

Updated: Feb 11, 2020, 03:22 PM IST
#DelhiResults2020: 'देशात 'मन की बात' चालणार नाही, हे दिल्लीकरांनी दाखवून दिले' title=

मुंबई: दिल्लीतील 'आम आदमी पक्षा'च्या (आप) विजयाने अरविंद केजरीवाल यांनी देशाला 'जन की बात' दाखवून दिली, असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. यामध्ये केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे. तर भाजपचे अक्षरक्ष: तीनतेरा वाजले आहेत. 

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भाजपला चिमटे काढले. आपण म्हणजेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोडला. दिल्लीतील जनतेने 'मन की बात' नव्हे तर 'जन की बात' आता देशात चालणार हे दाखवून दिले. तथाकथित राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा 'झाड़ू'समोर टिकाव लागला नाही, अशी जळजळीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

भाजपच्या विचारांचं देशभरात डी-फॉरेस्ट्रेशन होईल- रोहित पवार

दिल्लीतील आतापर्यंतच्या निकालानुसार आम आदमी पक्ष ६३ जागी तर, भाजप अवघ्या ७ जागी आघाडीवर आहे. त्यामुळे 'आम आदमी पक्ष' (आप) पुन्हा एकदा बहुमत मिळवून सत्तास्थापन करेल, हे जवळपास निश्चित झाले आहे. 

दिल्लीत 'आप'ची सरशी, पण भाजपचाही मोठा फायदा

२०१५ मध्ये दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांपैकी ६७ जागांवर 'आप'ने बाजी मारली होती. यंदाही 'आप'कडून अशाच कामगिरीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने दिल्लीत अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखाली केलेला आक्रमक प्रचार पूर्णपण निष्प्रभ ठरल्याचे सिद्ध झाले आहे.