मुंबई : छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय छात्र संमेलनाला परवानगी नाकारण्यात आली असून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.
छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय छात्र संमेलन विले पार्ले येथील भाईदास सभागृहात हा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने विद्यार्थ्यांनी जुहू पोलीस स्टेशनसमोरच आंदोलन सुरू केलं आहे. या कार्यक्रमात आमदार जिग्नेश मेवानी आणि उमर खालिद हे भाषण करणार होते. राज्यात आधीच वाद पेटलेला असताना हा वाद वाढू नये म्हणून या कार्यक्रमाची परवानगी नाकारण्यात आली आहे.
#Mumbai: Members of Chhatra Bharti stage protest outside Juhu Police Station after some members were detained by Police. They have been denied permission for their event at Bhaidas Hall, where Umar Khalid & Jignesh Mevani were also invited. pic.twitter.com/AGlxk0dc2O
— ANI (@ANI) January 4, 2018
आम्ही हा कार्यक्रम संविधानिक स्वरूपाने करू असे आम्ही सांगितले तरी परवानगी दिली नाही. जिग्नेश मेवानी आणि उमर खालिद यांना स्किप करून आम्ही कार्यक्रम घेण्यास तयार होतो. अनेक विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. आणि त्यांना कुठे नेलंय हेही कळत नाहीये, अशी माहीती छात्र भारतीच्या एका विद्यार्थ्याने दिली.
परवानगी नाकारण्यात आल्यानंतर छात्र भारतीचा अध्यक्ष दत्ता ढेगे, रिचा सिंग(अलाहाबाद), प्रदीप नरवाल (हरियाणा), बेदाब्रता गोगई (आसाम) या विद्यार्थी नेत्यांसह १२-१५ विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात गुरुवारी सकाळी ११ पासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे संमेलन पार पडणार होते. यात विद्यार्थी नेत्या रिचा सिंग, प्रदीप नरवाल, बेदाब्रता गोगई आणि छात्रभारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होत्या. भीमा कोरेगाव प्रकरण आणि महाराष्ट्र बंद नंतर जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद काय बोलणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं.