छात्र भारती कार्यक्रम : आमदार कपिल पाटील पोलिसांच्या ताब्यात

छात्र भारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यावर आता शिक्षक आमदार कपिल पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

Updated: Jan 4, 2018, 01:49 PM IST
छात्र भारती कार्यक्रम : आमदार कपिल पाटील पोलिसांच्या ताब्यात title=

मुंबई : छात्र भारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यावर आता शिक्षक आमदार कपिल पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

आमदार कपिल पाटील ताब्यात

छात्र भारतीशी संबंधीत आमदार कपिल पाटील यांना पोलिसांनी कार्यक्रम स्थळावरून ताब्यात घेतलं आहे. परवानगी नाकारली छात्र भारती संघटनेचा अध्यक्ष दत्ता ढगे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज विले पार्ल्यात छात्र भारतीच्या वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद उपस्थित राहणार होते. 

विद्यार्थ्यांची धरपकड

सकाळापासून भाईदास हॉलसमोर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमा झाले होते. पोलिसांकडून विद्यार्थ्यांची धरपकड सुरू आहे. पोलिसांनी कालचा महाराष्ट्र बंद आणि त्याआधीच्या अशांत परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज छात्रभारतीच्या कार्यक्रमाला परवानागी नाकरण्यात आली.

हेही होते वक्ते?

विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात गुरुवारी सकाळी ११ पासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे संमेलन पार पडणार होते. यात विद्यार्थी नेत्या रिचा सिंग, प्रदीप नरवाल, बेदाब्रता गोगई आणि छात्रभारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होत्या. भीमा कोरेगाव प्रकरण आणि महाराष्ट्र बंद नंतर जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद काय बोलणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं.