मुंबई : राज्यामध्ये महाविकासआघाडीचं सरकार यावं यासाठीची चर्चा सकारात्मक दिशेने सुरू आहे. काही मुद्द्यांवर चर्चा बाकी आहे, उद्याही चर्चा सुरु राहणार आहे, असं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. मुंबईमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची सत्तास्थापनेसाठी बैठक झाली.
अजून काही बारकावे शिल्लक आहेत, त्यावर चर्चा सुरु आहे. जेव्हा हे सगळं अंतिम होईल तेव्हा तिन्ही पक्षांचे नेते आपल्याला भेटतील, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे. 'बऱ्याच गोष्टींवर आम्ही मार्ग काढला आहे. पण एकही मुद्दा अनुत्तरित ठेवायचा नाही, असं आम्ही ठरवलं आहे. म्हणून सगळे विषय सोडवल्यानंतर सगळ्या विषयांची उत्तर घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत. चर्चा चांगली आणि योग्य दिशेने सुरू आहे,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दुसरीकडे मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सहमती झाली आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्रिपदासाठी सहमती झाली असली तरी स्वत: उद्धव ठाकरेंनी याबाबत अजून होकार दिला आहे का नाही? याबाबत माहिती मिळू शकली नाही. महाविकासआघाडीची उद्या पत्रकार परिषद व्हायची शक्यता आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
महाविकासआघाडीची बैठक मुंबईतील नेहरु सेंटरमध्ये सव्वा दोन तास चालली. शिवसेनेकडून या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आले होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल, अहमद पटेल आणि बाबा सिद्दीकी यांनी या बैठकीला हजेरी लावली होती.