मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२० मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्य सेवा परीक्षा २०२० साठीची मुख्य परीक्षा शनिवारपासून तीन दिवस आणि सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा ही शनिवारी घेण्यात येणार आहे. उर्वरित सर्व पूर्व तसेच मुख्य परीक्षा रविवारी घेण्याचे नियोजित आहे.
राज्यसेवा परीक्षा २०२० साठीची जाहिरात डिसेंबर २०१९ मध्ये प्रसिद्ध होईल. पूर्व परीक्षा दिनांक ५ एप्रिल २०२० रोजी तर मुख्य परीक्षा शनिवार दिनांक ८ ऑगस्ट ते सोमवार दि. १० ऑगस्ट, २०२० अशी तीन दिवस घेण्यात येणार आहे. दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेसाठी जानेवारी २०२० मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा १ मार्च रोजी तर मुख्य परीक्षा१४ जून २०२० रोजी घेण्यात येणार आहे.
सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०२० साठी जानेवारी २०२० मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा १५ मार्च २०२० रोजी तर मुख्य परीक्षा १२ जुलै २०२० रोजी घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेसाठी फेब्रुवारी २०२० मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा दिनांक ३ मे २०२० रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र वन सेवा परीक्षा २०२० साठी मार्च २०२० मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून पूर्व परीक्षा १० मे रोजी तर मुख्य परीक्षा ११ ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी मार्च २०२० मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक १७ मे २०२० मध्ये घेण्यात येणार आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.