Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाचे कौल समोर आले आहेत. हळुहळू चित्र स्पष्ट होऊ लागले आहेत. आतापर्यंत आलेल्या कलानुसार 225 जागांवर महायुती पुढे आहे. तर महाविकास आघाडी 50 जागांवर आहे. महायुती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करतान दिसत आहे. हे निकाल महाविकास आघाडीसाठी धक्कादायक आहेत. यावर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाही. बॅलेट पेपर म्हणजेच मतपत्रिकावर पुन्हा निवडणूक घ्या!, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. जगाच्या पाठीवर निवडणुकीत इतका फ्रॉड झाला नसेल, असे राऊत म्हणाले. हा निकाल मान्य नाही! नाही! त्रिवार नाही!
लोकशाही आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई सुरूच राहील, असेही राऊत पुढे म्हणाले.
महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाही.ballot पेपर (मतपत्रिका) वर पुन्हा निवडणूक घ्या! जगाच्या पाठीवर
निवडणुकीत इतका फ्रॉड झाला नसेल.
हा निकाल मान्य नाही! नाही! त्रिवार नाही!
लोकशाही आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई सुरूच राहील!— Sanjay Raut (@rautsanjay61) November 23, 2024
लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचा इतका मोठा विजय झाला असावा यावर संजय राऊत म्हणाले, "मला असं वाटत नाही. महाराष्ट्रात लाडके भाऊ, लाडके मामा, लाडके काका, लाडके आजोबा, लाडके दादा नाहीयेत का? मी परत सांगतो की, ही मोठी गडबड आहे. महाराष्ट्रावर अदानींचं बारीक लक्ष होतं. काल अटक वॉरंट निघाल्यानंतर असा निकाल लागेल अशी आमच्या मनात शंका होती. अमेरिकेत अदानींवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते अप्रत्यक्षपणे भाजपावरच होते. या निवडणुकीत सर्वात जास्त पैशांचा वापर, ताकद अदानींनी केला. या निकालावर गौतम अदानींचा प्रभाव आहे का? कारण मोदी, फडणवीस, शिंदे आणि अदानी हे वेगळे नाहीत".
"शरद पवारांनी महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं. त्यांना तुम्ही 10 जागा देण्यासही तयार नाही. नेमकी अशी काय गडबड महाराष्ट्रात आहे. हा निकाल जनतेचा कौल आहे हे मानण्यास आम्ही तयार नाही. निवडणुकीत जय-पराजय होत असतं, आम्हाला त्यावर काही बोलायचं नाही. पण लावून घेतलेल्या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचा विश्वास बसू शकत नाही," असंही संजय राऊतांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, "पैशांचा वापर झाला आहे, याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार कसे काय निवडून येऊ शकतात? ज्यांच्या गद्दारी, बेईमानीविरोधात महाराष्ट्रात रोष आहे त्या अजित पवारांना इतक्या जागा कशा? शरद पवारांच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळाला होता".
"लोकसभेच्या निकालातही गडबड झाली होती. अन्यथा नरेंद्र मोदींचा पराभव झाला असता. निकालामागे खूप मोठं कारस्थान दिसत आहे. हा निकाल लावून घेतलेला आहे, जनतेने दिलेला नाही. आमच्या महाविकास आघाडीला 75, 100 जागाही देत नसाल तर अमित शाह, नरेंद्र मोदी आणि अदानी यांनी हा निकाल ठरवून लावला आहे," असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात गौतम अदानी जिंकलेत हे दाखवायचं आहे असा आरोपही त्यांनी केला.
मुंबई विकायला काढण्याचा डाव असून, आमचा त्याला विरोध आहे. आमचा विरोध मोडून काढण्यासाठी हे निकाल लावून घेतलेले आहेत. महाराष्ट्रात असे निकाल कधी लागूच शकत नाहीत असं संजय राऊत म्हणाले आहेत. आम्ही गाफील नव्हतो, मात्र हा जनतेचा कौल नाही. हा अदानी आणि त्यांच्या टोळीने लावून घेतलेला कौल आहे असंही ते म्हणाले. एकनाथ शिदेंना 20 च्या वर जागा मिळणार नाही असा भाजपाचाही अंदाज होता. भाजपा 65 ते 70 जागा जिंकेल असा अंदाज होता असंही संजय राऊत म्हणाले. पण यंत्रणाच ताब्यात घेतल्या आहेत असंही राऊतांनी सांगितलं.