Aamshya Padavi : लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमश्या पाडवी आणि त्यांच्या समर्थकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार कसा करायचा म्हणत आमश्या पाडवी यांनी ठाकरे गटाला रामराम केला आहे.
ज्यांनी आमदार केलं त्यांच्यासोबत आलो - आमश्या पाडवी
"पक्ष एकत्र असताना माझी निवड झाली. पक्षात काम करत असताना दोनवेळा मला शिवसेनेतून उमेदवारी मिळाली. ज्या भागात मी काम करतो तिथला विचार केला तर पाहिजे तसा विकास झालेला नाही. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून माझ्या कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश केला आहे. माझ्या सहकाऱ्यांनी मला दादा तुम्ही आमदार झाले पण आपल्या भागातील कामे प्रलंबित आहेत त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो की, ज्यांना तुम्हाला आमदार केलं त्यांच्यासोबत जायला पाहिजे असे सांगितले. आम्ही काँग्रेस पक्षासोबत वर्षानुवर्षे लढत आलो. त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मदत करण्याचा मला आदेश मिळत असल्याचा विषय आला तेव्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह मी पक्षप्रवेश केला," असे आमश्या पाडवी म्हणाले.
लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्यासोबत हे राजकारणात चालत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
"ज्यांच्यासोबत आम्ही अनेक वर्ष लढलो, त्यांच्यासोबत काम कसं करायचं हीच आमची भूमिका होती. 2019 ला शिवसेना-भाजपा एकत्र निवडणूक लढलो. बाळासाहेब ठाकरे-नरेंद्र मोदी असे फोटो लावून लोकसभा, विधानसभा लढवल्या. पण निकालानंतर सर्व दरवाजे उघडे आहेत असं प्रमुख म्हणायला लागले. त्याचदिवशी महाराष्ट्राला जाणीव झाली डाल मै कुछ काला है..लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्यासोबत हे राजकारणात चालत नाही. राजकारणात नीतीमत्ता, उद्देश, वैचारिक विचारधारा या पाळाव्या लागतात," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
"शिवसेनेचे खच्चीकरण होतंय, शिवसैनिकांचे खच्चीकरण होतंय, स्वत:च्या स्वार्थासाठी कुणी पक्ष इतरांच्या दावणीला बांधू शकत नाही. आपल्याकडे लोकशाही आहे. अन्यायाविरोधात पेटून उठा असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. तो मंत्र आम्ही आत्मसात केला. जेव्हा अती झालं तेव्हा बाळासाहेबांची शिवसेना काय आहे हे सर्वांनी पाहिले. आमश्या पाडवी तुम्ही आमचेच होते, आमचेच राहणार आहोत. विकासासाठी आपण एकत्र आलोय. तुमच्या भागातील विकासाला कुठेही कमी पडू देणार नाही," असंही आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं.
कोण आहेत आमश्या पाडवी?
आमश्या पाडवी यांनी 1995 पासून स्थानिक राजकारणाला सुरुवात कोवली विहीर गावाचे सरपंच म्हणून केली. दोन वेळा अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापतीपद भूषवले आहे. वीस वर्षापासून पंचायत समिती सदस्य होते. ते अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असून, गेल्या अकरा वर्षापासून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आदिवासींच्या विविध प्रश्नांवर आक्रमक मोर्चे काढणारा आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी सेनेत प्रवेश केला तेव्हापासून ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्यांनी दोन वेळा शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक देखील लढवली. मात्र दोन्ही वेळा त्यांच्या पराभव झाला होता. मात्र आक्रमक आदिवासी चेहरा असल्याने शिवसेनेच्यावतीने त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं. विधान परिषदेत आदिवासींच्या बुलंद आवाज म्हणून आमश्या पाडवी यांची ओळख निर्माण झालेली आहे.
हे दुर्दैव आहे - संजय राऊत
"उद्धव ठाकरेंनी तळागळातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. आमश्या पाडवींनी हा निर्णय का घेतला हे मला माहिती नाही. पण हे सगळे सोडून जात असतील तर दुर्दैव आहे," अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
ठाकरे गटाचे विरोधीपक्षनेते पद जाणार?
आमश्या पाडवी शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे गटाचं विधानपरिषदेतील संख्याबळ देखील कमी झालं आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील ठाकरे गटाकडील विरोधी पक्षनेते पद धोक्यात आलं आहे. आमश्या पाडवी गेल्यामुळे आता ठाकरे गटाकडे केवळ सात आमदार उरले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडे आठ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पद जाणार असल्याचे बोललं जात आहे.