Mahesh Gaikwad : कल्याण पूर्वेतील शिंदे गटाचे शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस ठाण्यात जमिनीच्या वादातून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. तेव्हापासून महेश गायकवाड हे चर्चेत होते. महिन्याभराच्या उपचारानंतर महेश गायकवाड घरी परतले होते. मात्र आता एका बांधकाम व्यावसायिकाने खंडणी मागितल्याचा आरोप करत महेश गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी संध्याकाळी नवी मुंबईतल्या एका बांधकाम व्यावसायिकाने पाच कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप करत उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी महेश गायकवाड यांच्यासह मलंगवाडी इथल्या चार ग्रामस्थांवर खंडणी, दमदाटीचे गुन्हे दाखल केले आहेत. तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाने गायकवाड यांच्यावर गावकऱ्यांच्या मदतीने अंबरनाथ तालुक्यातील त्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
दोन महिन्यात जमिनीच्या प्रकरणात महेश गायकडवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्याचत दुसरा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सीबीडी बेलापूर येथील बांधकाम व्यावसायिक सदृध्दीन बशर खान (58) यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. ऑगस्ट 2023 ते नोव्हेंबर 2023 या हा सगळआ प्रकार घडल्याची माहिती खान यांनी दिली. आरोपींमध्ये महेश गायकवाड, यशवंत मुका फुलोरे, रोहिदास मुका फुलोरे, गणेश यशवंत फुलोरे, शेवंतीबाई मुका फुलोरे यांचा समावेश आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2009 मध्ये तक्रारदार सदृध्दीन खान यांनी मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुशीवली गावातील श्यामसुंदर लक्ष्मण पाटील यांची 27 एकर जमीन सर्व प्रक्रिया पूर्ण करून खरेदी केली. त्यानंतर सात बारा उतारा खान यांच्या नावे झाला. त्यानंतर 2019 मध्ये खान यांनी अंबरनाथ भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून जमीन मोजणी करून घेतली. त्यावेळी मलंगगवाडीतील शेवंताबाई मुका फुलोरे आणि इतरांनी त्यांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी देत विरोध केला.
त्यानंतर ऑगस्ट 2023 खान यांच्या जमिनीवर‘ही जमीन महेशशेठ दशरथ गायकवाड आणि इतर आरोपींच्या कब्जे वहिवाटीची आहे. या जमिनीत कोणी अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल’ असा फलक लावण्यात आला. खान यांनी तो फलक काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला आरोपींनी विरोध केला. आम्हाला तुमच्या जमिनीतील अर्धी जमीन द्या, अन्यथा आम्हाला पाच कोटी द्या, असे आरोपींनी खान यांना सांगितले.
सप्टेंबर 2023 मध्ये खान यांनी पुन्हा हिललाईन पोलिसांच्या मदतीने आरोपींनी लावलेला फलक काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळीही आरोपींनी त्यांना विरोध केला. हे सगळं सुरु असताना महेश गायकवाड हे त्यांच्या साथीदारांसह तिथे आले. गायकवाड यांनी थेट आम्ही जी पाच कोटीची मागणी केली आहे, ती पूर्ण करा, अशी मागणी खान यांच्याकडे केली. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने महेश गायकवाड तिथून निघून गेले.
दरम्यान, महेश गायकवाड, फुलोरे कुटुंबिय माझ्या जागेत हक्क दाखवून ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच जमिनीवरील हक्क सोडण्यासाठी पाच कोटी खंडणीची मागणी करत असल्याची तक्रार सदृध्दीन खान यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर पोलिसांनी महेश गायकवाडांसह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.