Maharashtra Politics : राज्यातील महत्त्वाचे पक्ष हे महायुती आणि महाआघाडीमध्ये सामील झाले आहेत. नुकतीच वंचित बहुजन आघाडी लवकरच महाविकास आघाडीत सामील झाली. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याला कारण ठरलं आहे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची घेतलेली भेट. आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे कारण स्पष्ट नसलं तरी आगामी काळातल्या निवडणुकांसंदर्भात ही भेट झाल्याचं बोललं जात आहे.
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या मध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या एक शिष्टमंडळाने देखील देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे आणि आशिष शेलारांच्या भेटीमुळे मनसे महायुतीत सहभागी होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या भेटीनंतर आता राज ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहे. पण ही पत्रकार परिषद कशासाठी आहे याबाबत कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही राज ठाकरेंसोबत भेट झाली आहे. त्यामुळेच मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं होते.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
"आगामी काळात मनसे कुठे असेल, कोणाबरोबर असेल ते वेळच सांगेल. आमची निश्चितपणे राज ठाकरे यांच्याशी मैत्री आहे. आमच्या भेटीगाठी होत असतात. आम्ही अनेक विषयांवर गप्पा मारतो. ते बऱ्याचदा काही चांगल्या सूचना करतात. कधीकधी आमच्यावर टीकाही करतात. परंतु, आम्ही एकत्र येऊन काम करू की नाही हे आत्ता सांगू शकत नाही. ही गोष्ट लवकरच आपल्याला संमजेल. अद्याप कोणीही त्यावर निर्णय घेतलेला नाही," असे देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.